आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहकांची दिशाभूल, 151 ब्रँड जाहिरातींंना नियंत्रकाचा दणका, बड्या कंपन्या जाळ्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भारतीय जाहिरात मानक संस्थेने (एएससीआय) केलेल्या पडताळणीमध्ये दुरचित्रवाणी, वर्तमानपत्रे तसेच अन्य माध्यमातून मागच्या वर्षभरात १९९ उत्पादनांच्या फसव्या व भ्रामक जाहिराती केल्याचे उघडकीस आले. त्यापैकी १५१ जाहिरातींवर एससीआयने कारवाई केली आहे. यामध्ये भारत पेट्रोलियम, अॅमेझॉनसह पतंजली ब्रँडच्या २५ जाहिरातींचाही समावेश आहे. फसव्या व भ्रामक जाहिरातींची पडताळणी करून त्यावर कारवाई करण्याच्या उद्देशाने केंद्रीय ग्राहक प्रकरणांच्या मंत्रालयाने फसव्या जाहिरातींसाठी तक्रार निवारण संकेतस्थळ  (जीएएमए)  सुरू केलेले आहे. 

२०१५-१६ काळात जीएएमएकडे दिशाभूल करणाऱ्या तसेच फसव्या जाहिरातींच्या सुमारे १०४६ तक्रारी आल्या आहेत. दरम्यान, ग्राहक मंत्रालयाकडेही मागील वर्षभराच्या काळात अशाप्रकारच्या जाहिरातींविरोधातील हजारो तक्रारी आल्या. सरकारकडून लोकसभेत देण्यात आलेल्या माहितीनुसार, २०१३ ते २०१६ या काळात भारतीय जाहिरात मानक संस्थेला सुमारे ५२५ जाहिराती ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या आढळून आल्या. यात अॅमेझॉन इंडिया, बैद्यनाथ आयुर्वेद, भारत पेट्रोलियम, लेन्सकार्ट, कॅडिला फार्मा, इमामी अॅग्रोटेक, व्हीएलसीसी, जॉन्सन अँड जॉन्सन इत्यादी कंपन्यांच्या उत्पादनाच्या जाहिरातींचाही समावेश आहे. 
ग्राहक संरक्षण अधिनियम १९८६ नुसार एखाद्या उत्पादनामध्ये समाविष्ट घटक, त्याच्या परिणामाबद्दल लिखित किंवा दृश्यात्मक रूपात सार्वजनिकरीत्या खोटी माहिती देणे, गुणवत्ता, दर्जा तसेच सेवांच्या बाबतीत चुकीचे दावे करणे, ग्राहकांमध्ये संभ्रम पसरवणारी माहिती देणे इत्यादी बाबींचा फसव्या तसेच दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमध्ये समावेश होतो. 
 
संकेतस्थळावर तक्रारीची सोय
ग्राहक मंत्रालयाने थेट तक्रार करता यावी, यासाठी जीएएमए (ग्रीव्हिलन्स अगेन्स्ट मिसलिडिंग अॅडव्हर्टाइजमेंट) संकेतस्थळ सुरू केले आहे. जाहिरातींबाबत शंका असल्यास यावर खाते तयार करून ग्राहक तक्रार नोंदवू शकतो. जीएएमए विभाग ती तक्रार राज्य तक्रार निवारण मंच आणि त्यानंतर केंद्रीय तक्रार निवारण यंत्रणेकडे पाठवते. 
 
प्रवर्गांनुसार तपासणी आणि कारवाई
^हेल्थकेअर, विमा, शिक्षण, अन्न तसेच प्रक्रियांशी संबंधीत १९९ फसव्या जाहिराती आम्ही शोधल्या आहेत. त्यापैकी १५१ ब्रँड्सवर कारवाई करण्यात आली. हा ग्राहकांच्या आर्थिक प्रश्नासोबतच त्यांच्या गरजांशीही खेळण्याचा प्रकार असल्याने आम्ही फसव्या व दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर बारकाईने लक्ष ठेवून असतो. 
श्वेता पुरंदरे, सचिव, एएससीआय
 
दिग्गज कंपन्याही अडकल्या कचाट्यात
मागील काही वर्षांत अनेक दिग्गज कंपन्या त्यांच्या जाहिरातीतील मजकुरामुळे अडचणीत आल्या. एएससीआयने त्यांच्यावर संहितेच्या कलम दोननुसार कारवाईसुद्धा केली. त्यात पतंजलीची दंतकांती, लॉरिअलचे शम्पू, हीरो मोटोकॉर्पची मोटारसायकल, व्होडाफोन, आयडिया व एअरटेल इत्यादी उत्पादनांचा समावेश आहे. एएससीआयने केलेल्या कारवाईनंतर अनेक कंपन्यांनी त्यांच्या जाहिराती मागे घेतल्या आहेत. तर बहुतांश कंपन्यांनी संहिता आणि नियमानुसार त्यात बदल केले आहेत.