आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: लहरी मान्सून...आठ दिवसांत 34 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; पावसात 55 दिवसांचा खंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पावसाअभावी पिके करपत असून यंदा खरीपाच्‍या उत्‍पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे. - Divya Marathi
पावसाअभावी पिके करपत असून यंदा खरीपाच्‍या उत्‍पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे.
औरंगाबाद - जूनमधील चांगल्या सुरुवातीनंतर नैऋत्य मोसमी पावसाने जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून आजवर दडी मारली आहे. पावसातील या ५० ते ५५ दिवसांच्या खंडामुळे राज्यातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. मूग, उडीद ही कमी कालावधीची  पिके हातातून गेली आहेत, सोयाबीन शेवटच्या घटका मोजत अाहे.
 
कापूस व तुरीसाठी आता चांगल्या पावसाची नितांत आवश्यकता आहे. दरम्यान, दुष्काळाचे सावट दिसत असल्याने मराठवाड्यातील बळीराजा पुन्हा व्याकूळ झाला आहे. ५ आॅगस्ट ते १३ ऑगस्ट २०१७ या कालावधीत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत तब्बल ३४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाने नुकताच राज्य सरकारला पाठवला आहे.
 
खरिपाच्या उत्पादनात घट : आगामी काळात उर्वरित ऑगस्ट  व सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस झाला तरी खरिपाच्या उत्पादनात ५० ते ६० टक्के घट येण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, राज्यात परतीचा पाऊस चांगला होऊन रब्बी हंगाम शेतकऱ्याच्या पदरात पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.  

मका, मूग, उडीद, सोयाबीन हातचे गेले; खरिपाचे उत्पादन घटणार  
जून-जुलै ते ऑगस्ट या पिकाच्या वाढीच्या काळात पावसात खंड पडल्याने खरीप धोक्यात आहे. हलक्या जमिनीतील मूग, उडीद, सोयाबीन हातची गेल्यात जमा आहे. कापूस व तुरीसाठी चांगल्या पावसाची तत्काळ गरज आहे. तो पडला तरी  उत्पादनात ५० ते ६०% घट येण्याची शक्यता आहे.
- डॉ. एस. बी. पवार, विस्तार कृषी विद्यावेत्ता, व.ना.म.कृ.वि. परभणी

परतीच्या पावसावर आशा  
पावसातील मोठे खंड आता संपतील. महाराष्ट्रावरील हवेचा दाब आता कमी होत आहे. समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढत आहे. यामुळे परतीचा पाऊस चांगला होईल. त्याचा फायदा मराठवाडा व विदर्भाला जास्त होईल.
- डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ

मराठवाडा, विदर्भात ३०% तूट
यंदा अातापर्यंत विदर्भावर मान्सूनची खप्पामर्जी राहिली आहे. अवर्षणप्रवण मराठवाड्यात तर पावसाचा दोन महिन्यांचा खंड पडला आहे. खान्देश, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रातही यापेक्षा वेगळे चित्र नाही.

मंद वाटचालीचा फटका यंदा केरळमध्ये नियोजित
वेळेपेक्षा लवकर दाखल झालेल्या मोसमी पावसाची नंतरच्या काळातील वाटचाल काहीशी मंदगतीने झाली. त्याचा सर्वाधिक फटका फटका राज्याला बसला. जूनच्या पहिल्या दोन आठवड्यांत चांगली हजेरी लावणारा पाऊस जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून गायब झाला. हमखास पावसाचा आणि पेरणी झालेल्या पिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला जुलै महिना कोरडा गेल्याने खरीप धोक्यात आला आहे. या काळात कमी कालावधीची पिके हातची गेली आहेत.

१ जानेवारी ते १५ ऑगस्टपर्यंत ५८० शेतकरी आत्महत्या
- १ जानेवारी पासून १५ अाॅगस्ट २०१७ पर्यंत म्हणजे २२६ दिवसांत मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत एकूण ५८० शेतकऱ्यांनी अात्महत्या केल्या.
- ५ ते १३ ऑगस्ट २०१७ या कालावधीत आठ दिवसांत एकूण ३४ म्हणजे दररोज सरासरी ४ शेतकऱ्यांनी जीवन संपवले.

पुढील स्लाइडवर वाचा... राज्यात दोन दिवस पाऊस होणार
 
बातम्या आणखी आहेत...