आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद शहरात होळीसाठी 55 झाडांची कत्तल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सिडकोची एन-12 भागात एक रोपवाटिका आहे. पूर्वी येथून रोपट्यांची विक्री होत असे. सलीम अली सरोवराच्या मागील बाजूस असणार्‍या या नर्सरीत भरपूर हिरवळ आहे. नारळ, लिंब, वड अशी 150 ते 200 मोठी झाडे येथे आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असणारी ही झाडे आत येणार्‍यांचे स्वागत करतात. सरोवरामुळे जमीन ओलिताखाली येते. यामुळे झाडे चांगली वाढली आहेत; पण हीच झाडे आता वृक्षतोड करणार्‍यांच्या निशाण्यावर आली आहेत. येथून सातत्याने झाडांची कत्तल होत आहे. होळीसाठी झाडांची लाकडे जाळली जातात. या पार्श्वभूमीवर लाकूडतोडे आणि परिसरातील होळी पेटवण्याच्या तयारीत असणार्‍यांनी येथे मोर्चा वळवला आहे. डीबी स्टार चमूने नर्सरीची पाहणी केली असता धक्क ादायक बाबी समोर आल्या.

खुलेआम कत्तल सुरू

नर्सरीत सध्या रोपट्यांची विक्री बंद असली तरी येथे असणारा समृद्ध वृक्षांचा खजिना सांभाळण्याची जबाबदारी सिडकोची आहे, पण विभागाला या खजिन्याची पर्वाच नाही. यामुळे येथे बिनधास्त वृक्षतोड सुरू आहे. डीबी स्टारच्या छाप्यामध्ये 50 ते 55 झाडांची कत्तल झाल्याचे दिसून आले. यात काही झाडे तर फार जुनी होती.

आणखी कत्तलीची तयारी

काही झाडे कापून जमीनदोस्त केली आहेत, तर काहींवर डाका पडण्याची तयारी सुरू आहे. कित्येक झाडांवर घाव घालून त्यांना अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आले आहे. योग्य वेळ पाहून त्यांना कापून त्यांचे लाकूड लांबवले जाणार यात शंका नाही. डीबी स्टारला अशा प्रकारे घाव केलेली 8-10 झाडे आढळली.

आग लावून केला खात्मा

झाडे कापण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरण्यात येत आहेत. खोडाला आग लावून त्यांना वाळवणे. वाळले की त्यावर घाव घालून तोडले जाते. अशा प्रकारेही 5-6 झाडांची कत्तल केल्याचे पुरावे डीबी स्टारकडे उपलब्ध आहेत.

मोठय़ांसोबत लहानांवरही घाव

अस्सल लाकूडतोडे अत्यंत कसबाने मोठय़ा झाडांवर घाव घालतात, तर होळीसाठी लाकडे जमा करणार्‍यांनी नवीन, छोटी छोटी झाडे कापली आहेत. नर्सरीत बांबूच्या झाडांचा मोठय़ा प्रमाणात समावेश आहे. त्यांना खोडासह जमीनदोस्त करण्यात आले आहे.

अन्य बाबतीतही बोंबाबोंब

केवळ झाडांच्या कत्तलीवरच या नर्सरीची पडझड थांबत नसून यास रोपवाटिका म्हणावे, अशी कोणतीच सुविधा येथे नाही.

दारूच्या पाटर्य़ा आणि बरेच काही..

सुरक्षारक्षकच नसल्यामुळे येथे बरीच अवैध कामे चालतात. सिगारेटची पाकिटे आणि जेवणाच्या रिकाम्या डिश पडून आहेत. येथे दररोज दारूच्या पाटर्य़ा होत असल्याचे नर्सरीच्या शेजारील बंगल्यातल्या रहिवाशांनी सांगितले. येथे अनैतिक कामेही चालतात.
झाली कचराकुंडी

नर्सरीच्या एका बाजूच्या भिंतीला लागूनच हनुमानाचे मंदिर आहे. येथे येणार्‍या भाविकांनी नर्सरीचा उकिरडा केला आहे. मंदिरातील निर्माल्य फेकण्यासाठी नर्सरीचाच वापर केला जातोय. शिवाय परिसरातील नागरिकांनाही महत्त्व नसून नर्सरीचे ते कचराकुंडीचीच वागणूक देतात.
नर्सरी दत्तक द्या
खरं तर ही नर्सरी शहरासाठी भूषण आहे. सिडकोने ठरवले तर हे ठिकाण पर्यावरणप्रेमींसाठी आदर्श स्पॉट ठरू शकते. पण आता हा जुगारी आणि दारूड्यांचा अड्डा झाला आहे. त्यातल्या त्यात वृक्ष तोडणार्‍यांना तर चार भिंतींच्या आत सुरक्षितपणे झाडे तोडण्यासाठी सिडकोने परवानाच दिला की काय? अशी शंका येते. सिडकोला शक्य नसेल तर ही नर्सरी आम्हाला चालवायला द्या.
सागर कवडे , रहिवासी
सिडकोचे अक्षम्य दुर्लक्ष
या नर्सरीतून वृक्षप्रेमींना रोपटी मिळायला हवीत; पण ती सोय येथे उपलब्ध नाही. नवीन झाडे लावण्याची सोय होत नसेल तर किमान आहे ती झाडे तोडण्यावर तरी सिडकोने बंदी घालावी. आतापर्यंत कापलेल्या झाडांचे आरोपी शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. येथे कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमावा. मनीषा चौधरी, दीपशिखा फाउंडेशन
कत्तल करणार्‍यांवर गुन्हे दाखल करू
हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. झाडांची कत्तल करणार्‍यांवर गुन्हे दाखल केले जातील. तसेच नर्सरीच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणार्‍या सुरक्षारक्षकांना तत्काळ कामावरून काढून टाकले जाईल.
डी. डी. वळवी, मुख्य प्रशासक, सिडको