आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रा.पं. सदस्याचा खर्च २० लाखांवर?, ५५५ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मतदान यंत्र ताब्यात घेऊन सोमवारी कर्मचारी बसद्वारे संबंधित गावी पोहोचले. छाया: मनोज पराती - Divya Marathi
मतदान यंत्र ताब्यात घेऊन सोमवारी कर्मचारी बसद्वारे संबंधित गावी पोहोचले. छाया: मनोज पराती
औरंगाबाद- केवळ शब्द अन् नातेसंबंधांवर लढवली जाणारी ग्रामपंचायत निवडणूक आता मोठी खर्चिक झाली आहे. नगर परिषद, मनपा, जि. प. सदस्यांना येणाऱ्या खर्चाच्या तोडीचा खर्च या निवडणुकीसाठी होऊ लागला आहे. काही मोक्याच्या गावात ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी उमेदवारांनी रविवारी सायंकाळपर्यंत डोळे चक्रावणारी रक्कम म्हणजेच २० ते २५ लाख रुपये खेर्च केल्याची चर्चा कानी येत आहे. त्यामुळे लोकशाहीच्या यज्ञाची सुरुवात समजली जाणारी ही निवडणूक आता सर्वात अवघड होत असल्याचेही या निमित्ताने समोर येत आहे.
जिल्ह्यात दुष्काळाचे सावट असल्याने निवडणुकीचा खर्च वाढल्याचे उमेदवारांकडून सांगण्यात येत आहे. मिळेल ते घेऊन टाका, असा सपाटा काहींना लावला अन् खर्चात वाढ झाल्याचे समजते. रविवारी प्रचार संपला तेव्हाच्या आकड्यात प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत कमालीची वाढ होण्याची शक्यता उमेदवार तसेच त्यांचे मॅनेजमेंट सांभाळणाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आरक्षित खुल्या जागांवरील सरपंचपदासाठी जोरदार रस्सीखेच असून तेथेच लाखोंचा खर्च होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या २० ते ३० दिवसांपासून घरोघर मद्य, मांस, तेल, पिठाचे वाटप यातच काहींचे लाखो खर्च झाले. याशिवाय शेवटच्या सत्रात थेट रोख रकमेचेही वाटप झाल्याचे दिसते. काही घरांत किराणा भरून देण्यात आला, काही ठिकाणी लाइट बिल उमेदवारांना भरावे लागले. त्यामुळे गावाचा ‘मुखिया’ होण्याच्या प्रयत्नात असलेल्या उमेदवारांना खिसा रिकामा करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

बिन विरोधहीगेले २५ च्या पुढे : जिल्ह्यातील ३३ ग्रामपंचायतीचे सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिनविरोध होण्यासाठी सदस्यांना काही लाख मोजावे लागले आहेत. ही रक्कम २५ लाखांच्या पुढे असल्याचे समजते. बिनविरोध होण्यासाठी मोजलेली रक्कम ही ‘शुअर शॉट’ होती. कारण रक्कम मोजली की सदस्य होणे ठरलेले, परंतु जी मंडळी आता काही लाखांत रक्कम मतदारांवर मोजत आहे, त्याचे काय होईल हे सांगता येत नाही. एवढे करूनही मतदारांनी बटण दाबताना गडबड केली तर पैसे गेले अन् मतदान केले तरच ते पैसे मार्गी लागले असे हे चित्र आहे.

राजकीय पार्श्वभूमी महागात?
ज्यांनीयापूर्वी राजकारण केले आहे, कोणी जिल्हा परिषदेपर्यंत जाऊन आले आहेत, ज्यांचे नातेवाइक सक्रिय राजकारणात आहेत, अशांना ही निवडणूक आणखीनच महागात पडल्याचे समजते. मतदार अशी पार्श्वभूमी असलेल्यांना सोडत नाहीत, अशीही चर्चा आहे. कोणाचा भाऊ, वडील, काका किंवा जवळचा नातेवाईक जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीवर आहे, अशा उमेदवारांचा खर्च यापेक्षाही जास्त असल्याचे ऐकिवात येत आहे. कारण त्यांच्यासाठी गावातील निवडणूक जिंकणे हे प्रतिष्ठेचे असते अन् त्याचा फायदा सजग मतदार घेत असल्याचे समजते.