आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुद्धलेणीवर उसळला भीमसागर, लाखो बौद्ध उपासक-उपासिका तथागताच्या चरणी नतमस्तक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या बुद्धलेणी (धम्मभूमी) परिसरातील बुद्धविहारात रविवारी 57 व्या धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त तथागत गौतम बुद्धांचे दर्शन घेण्यासाठी लाखो उपासक-उपासिकांनी गर्दी केली होती.

बुद्धविहारामध्ये भदंत विशुद्धानंद बोधी यांनी भंतेंच्या उपस्थितीत बुद्धवंदना घेतली. त्यानंतर राजाभाऊ शिरसाट यांच्या संचाने ‘चांदण्याची छाया कापराची काया..माउलीची माया होता भीमराया..’, ‘ सांगा आम्हा बिर्ला, बाटा, टाटा कुठंय हो सांगा..धनाचा साठा आमचा वाटा कुठंय हो..’ अशी समाजप्रबोधनात्मक गीते सादर केली. याशिवाय वामनदादा कर्डक यांनी लिहिलेल्या प्रबोधनात्मक गीतांनी अनुयायांना अंतर्मुख केले. लेणी मार्गावरील रस्ते गर्दीने फुलून गेले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कमानीपासूनच बॅरिकेड्स लावण्यात आले होते. वाहतूक पोलिसांनी नियोजन करून वाहतूक वळवली. सोनेरी महाल परिसरात वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली.

लेणी परिसरात पोलिसांचा चोख पोलिस बंदोबस्त होता, तर मुख्यालय, बेगमपुरा आणि गुन्हे शाखा, वाहतूक शाखेचे अधिकारी येथे तैनात होते. पोलिस आयुक्त संजयकुमार आणि पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी विहारात जाऊन दर्शन घेतले.

भोजनदान अन् प्रतिज्ञा : बुद्धवंदनेनंतर भीमशक्ती संघटनेच्या वतीने 101 भंतेंना भोजनदान देण्यात आले. विहारासमोरच उभारण्यात आलेल्या सभामंडपात भदंत विशुद्धानंद बोधी यांनी विविध ठिकाणांहून आलेल्या बौद्ध उपासक -उपासिकांना धर्माची शिकवण असलेल्या 22 प्रतिज्ञेची शपथ दिली. खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार प्रदीप जैस्वाल यांनी सकाळी विहारात जाऊन वंदन केले. यानंतर परिसरात नव्याने बांधण्यात येणार्‍या विपश्यना हॉलच्या निर्मितीसाठी दहा लाखांच्या निधीची घोषणा करण्यात आली.