आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 58.2 MM Rain Within Four Hours, Water Enter In Hundred Of Citizens Home

चार तासांत ५८.२ मिमी पाऊस, शेकडो नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गुरुवारी दिवसभर सूर्य तळपला. सायंकाळी आकाशात ढग जमायला सुरुवात झाली. रात्री साडेआठ वाजेपर्यंत केवळ एक मिमी पाऊस पडला होता. त्यानंतर मात्र मेघगर्जनेसह धो धो पावसाने अक्षरश: शहराला झोडपून काढले. शेकडो नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांची त्रेधा उडाली. प्रतापनगर पुलावरील पाण्याने धोक्याची पातळी गाठली होती. १ जूनपासून १८ पर्यंत २०५ मिमी तर गुरूवारी ८.३० ते रात्री १२.३० पर्यंत ५८.२ मिमी पावसाची नोंद झाली.

औरंगाबादेत मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला (७ जून) आगमन झालेल्या मान्सूनने एकही दिवस उसंत घेतलेली नाही. दुपार ते सायंकाळपर्यंत कडक ऊन व नंतर दमदार पाऊस पडत आहे. १८ जून रोजी इतर दहा दिवसांच्या तुलनेत धुवाधार पाऊस पडला. बालाजीनगर, आदर्शनगर, चिकलठाणा, कामगार कॉलनी, मुकुंदवाडी राजनगर, विष्णूनगर, जटवाडा, हर्सूल, देवळाई, गारखेडा चौक, उस्मानपुरा परिसरातील शेकडो नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने सर्वत्र हाहाकार उडाला होता. बालाजीनगरात २५, अादर्श कॉलनी गारखेड्यात १० घरांमध्ये पाणी शिरल्याची तक्रार नागरिकांनी केली. दिशा घरकुल सातारा-देवळाई येथेही अनेक घरांमध्ये पाणी शिरले. २५ पेक्षा अधिक दुचाकी पाण्यात बुडाल्या होत्या.

पावसाचा नवा विक्रम
६ ते १८ जूनदरम्यान शहरात २०५ मिमी पावसाच्या विक्रमाची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. गतवर्षी ९ जून रोजी एकाच दिवशी ५७ मिमी पाऊस पडला होता, तर त्यापूर्वी एवढा पाऊस पडल्याची नोंद नाही.