आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटीत 6 डॉक्टरांना डेंग्यू, तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह तर तिघे संशयित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - संपूर्ण शहराच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या घाटीत डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाली आहे. तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर तिघे संशयित उपचार घेत आहेत. घाटी परिसरात धूर फवारणी किंवा अॅबेट टाकले जात नसल्याचे विद्यार्थी डॉक्टरांचे म्हणणे आहे.

मेडिसिन विभागाचे डॉ. शेषाद्री गोडा, डॉ. खलील अहमद, आंतरवासिता डॉ. स्नेहा पाटील यांचा अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आला आहे. तर पॅथॉलॉजीच्या निवासी डॉ. अश्विनी सरोदे, मेडिसिनचे प्रा. डॉ.शैलेश मठपती आणि प्रा. डॉ. एकनाथ सानप यांच्यावर डेंग्यू संशयित म्हणून उपचार सुरू आहेत. शहरात डेंग्यूची साथ जोरात सुरू आहे. शासकीय तसेच खासगी रुग्णालये डेंग्यूच्या रुग्णांनी भरली आहेत. लहान मुलांच्या रुग्णालयात डेंग्यूचे अनेक रुग्ण भरती आहेत.

सप्टेंबर महिन्यातील आकडा : सप्टेंबरमहिन्यात डेंग्यूच्या २१ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर ४२ जणांवर संशयित म्हणून उपचार सुरू आहेत.

नागरिकांच्या सहभागाची गरज : महानगरपालिकेच्या वतीने डास नियंत्रण कार्यक्रम राबवला जात असला तरीही नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. डेंग्यूचा डास स्वच्छ पाण्यात वाढत असल्याने स्वच्छ पाणी झाकून ठेवा. दोन-तीन दिवसातून एकदा पाणीसाठा कोरडा करा. मच्छरदाणी लावून झोपा आणि दिवसा पूर्ण अंग झाकणारे कपडे परिधान करा, ही काळजी नागरिकांनी स्वत:च घ्यायला हवी.

तुटपुंजी व्यवस्था
१५लाखांच्या शहरात १०० एएनएम, २१ एमपीडब्ल्यू, २५ फवारणी यंत्र अशा तुटपुंज्या यंत्रणेच्या साहाय्याने डासांची रोखथाम सुरू आहे. मनपाच्या विविध आरोग्य केंद्रांवर नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींची मदत घेऊन डास नियंत्रण मोहीम राबवली जात आहे.

गेल्या वर्षी घरातच सापडल्या डास अळ्या
गेल्यावर्षी मनपा पथकाने शहराच्या विविध भागांत मोहिमा राबवल्या त्या वेळी नागरिकांच्या घरातील पाण्यात मोठ्या प्रमाणात डास अळ्या सापडल्या होत्या. घरामध्ये या डासांना फोफावू देणे नागरिकांच्या हाती आहे, असे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास जगताप यांनी सांगितले.

साताऱ्यात एक रुग्ण
साताऱ्यातीलचोपडे वस्तीजवळील, तिरुपती नगरमधील संदीप प्रल्हाद वावधने वय २१ वर्षांच्या तरुणाला दोन दिवसांपासून डेंग्यूची लागण झाली असून त्याला खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मनपाला मात्र काहीच माहिती नव्हती.
बातम्या आणखी आहेत...