आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 6 Officers Caught With 14 Lakh Rupee By Anti Corruption

रोहयो भ्रष्टाचार दडपण्यासाठी फौजदाराला लाच देणारे 6 अधिकारी 14 लाख रुपयांसह जाळ्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई टाळण्यासाठी फौजदाराला 14 लाखांची लाच देऊन तोडीपाणी करणारे सहा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात अडकले. निवृत्त गटविकास अधिकारी, जि.प. शाखा अभियंता, दोन ग्रामसेवक व दोन ठेकेदार अशा सहा जणांना सोमवारी क्रांती चौकातील मेनॉर हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडण्यात आले. लाच देणा-यांना अटक होण्याची ही पहिलीच घटना असावी.
रोहयो घोटाळ्याप्रकरणी सिल्लोड व अजिंठा पोलिसांत 2012 मध्ये विविध गुन्हे दाखल झाले. सिल्लोड ग्रामीणचे पोलिस उपनिरीक्षक नामदेव मद्दे त्याचा तपास करत होते. यात तत्कालीन गटविकास अधिकारी तेजराव ढगे, ग्रामसेवक शरद देशपांडे, पाणीपुरवठा ठेकेदार गजानन वाघ, आन्वीचे ग्रामसेवक किशोर जाधव, सिल्लोड उपविभाग शाखा अभियंता तुळशीराम खरात आणि मजूर ठेकेदार तुकाराम नवले आरोपी असल्याचे निष्पन्न होणार होते. त्यासाठी त्यांना 28 जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर सर्व आरोपींकडून 25 लाख रुपये देण्यात येतील, प्रकरणाचा निपटारा तत्काळ करा, असे म्हणत ढगेने उपनिरीक्षक मद्दे यांना फोन केला. मद्दे यांनी पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याशी थेट पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार पुणे एसीबीचे पोलिस अधीक्षक सारंग आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक राजेंद्र गलांडे, हेमंत भट, जगन्नाथ कळसकर, निरीक्षक वैशाली गलांडे, योगेश पवार, प्रभा गायकवाड, प्रशांत बोराडे, चंद्रकांत करुणाकर यांनी मेनॉर हॉटेलमध्ये लाचेचे 14 लाख रुपये देताना सहा अधिकारी, ठेकेदारांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहा जणांना अटक करण्यात आली आहे. याचा पुढील तपास स्थानिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देण्यात आला आहे.
वर्गणीसारखे जमवले पैसे
लाचेसाठी किशोर जाधव यांनी 12 ग्रामसेवकांकडून प्रत्येकी 50 हजार असे 6 लाख रुपये जमवले. शाखा अभियंता तुळशीराम खरातने तीन अधिका-यांकडून 3.50 लाख, ढगेने 1 लाख रुपये, तर ठेकेदार वाघने इतर साथीदारांकडून 3.50 लाख असे 14 लाख दिले. ढगेच्या झडतीत आणखी एक लाख रुपये सापडले.
मात्र या 1 लाख रुपयांची नोंद घेण्यात आलेली नाही.
एसीबी शहरात ठाण मांडून
पुण्याचे एसीबी पथक रविवारपासून शहरातील हॉटेलात ठाण मांडून होते. ढगे याने रक्कम घेण्यासाठी मद्दे यांना हडकोतील टीव्ही सेंटरला बोलावले होते. पण ‘मी मेनॉरमध्ये जेवण करत असून, तुम्हीच इकडे या,’ असे मद्दे म्हणाले. त्यानंतर ढगे यांच्यासह सहा जण मेनॉरमध्ये आले. तेथेच पकडले गेले.
महाघोटाळा उघड होऊ शकतो : एसपी सिंधू
घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती आली होती. धरणेही झाले. मात्र, चौकशी अहवालात लाच देणा-यांची नावे नव्हती. असे असतानाही तपास करणा-या पोलिस अधिका-यास तीन महिन्यांत अहवाल देण्याचे माझे आदेश होते. सखोल चौकशीअंती या सर्वांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. महिनाभरात आरोपपत्र तयार करण्याचे आदेश मी दिले होते. चार्जशीटमध्ये नावे येऊ नयेत यासाठी या सर्वांनी लाच देण्याचे ठरवले. सर्वांच्या हालचालींवर लक्ष होतेच. घोटाळेबाज मोठ्या पदावरील असल्याने मी प्रकरण एसीबीच्या महासंचालकांना कळवले. कारण स्थानिक पथकामार्फत ही कारवाई यशस्वी होऊ शकली नसती. सध्या हा घोटाळा छोटा वाटत असला तरी याचे धागेदोरे दूरपर्यंत पसरले आहेत. महाघोटाळा उघडकीस येऊ शकतो.