आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठणी विणणाऱ्या 60 महिलांची स्वतंत्र कंपनी स्थापन होणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- एकेकाळी मोल मजुरी करणाऱ्या महिला आज स्वत: पैठणी विणकर उद्योजिका बनल्या आहेत. एवढेच नव्हे, तर लवकरच त्यांची पैठण येथे पुष्प दीप पैठणी साडी क्लस्टर कंपनी साकारणार आहे. त्यासाठी साडेचार कोटींचा प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात आला असून तो मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. 

पैठण येथील साठ महिला पैठणी विणकरांकडे मोलमजुरी करायच्या. तुटपुंज्या मजुरीतून कसाबसा कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्ण करावा लागत असे. यावर मात करणे स्वावलंबी बनण्यासाठी पैठणी विणकामात आणखी कौशल्य साध्य करण्याचा या महिलांनी संकल्प केला. त्यानुसार प्रथम एमएसएसआयडीसी अंतर्गत सहा महिने प्रशिक्षण घेतले. त्यांना धारवाड, कर्नाटक, बंगळुरू, दिल्ली, सूरजखेड, मुंबई, ससमीरा येथे धागा निर्मिती, कापड तयार करणे, रंग काम, डिझायनिंगचे प्रशिक्षण मिळाल्याने त्या आज पैठणी हस्तकला विणकामात तरबेज झाल्या आहेत. वर्षभरात लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळू लागले आहे. 

मात्र, नवनवीन तंत्रज्ञान आल्याने पैठणी व्यवसायाचे झपाट्याने यांत्रिकीकरण झाले आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी हस्तकलेबरोबरच नवीन तंत्रज्ञानाच्या वापराची जोड देणे अनिवार्य बनले आहे. ही काळाची गरज ओळखून स्वतंत्र वसाहत निर्मितीसाठी महिलांनी ४२ लाख रुपये जमा करून दोन एकर जागा खरेदी केली आहे. आर्थिक चणचण असल्याने त्यांनी रेशीम विभागाच्या मदतीने कंपनी स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. 

त्यासाठी सीएमआयए आणि गुरू गोविंद सिंग कॉलेजच्या टेक्सटाइल विभागाने मदतीचा हात पुढे केला आहे. सीएमआयएने तर लाखांवर कंपनी प्रोजेक्ट इतर कामांसाठी आर्थिक साह्य दिले. त्यामुळेच साडेचार कोटींचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात यश आले आहे. सरकारकडून प्रस्तावास मंजुरी मिळताच कंपनी उभारणे, तंत्रज्ञान खरेदीला लगेच सुरुवात केली जाणार असल्याची माहिती प्रादेशिक रेशीम विभागाचे संचालक दिलीप हाके, कंपनीच्या पुष्पा पोकळे यांनी सांगितले. 

असे होतील कंपनीचे फायदे 
पैठणी विणकरांची स्वतंत्र पहिली कंपनी साकार होण्याचा मान औरंगाबादला मिळेल. त्यामुळे पैठणी विणकरांसाठी रोजगार उपलब्ध होईल. हँडलूम, स्लिकलूमद्वारे शुद्ध रेशमापासून तयार झालेलीच पैठणी ग्राहकांना मिळेल. रेशीम शेतीला चालना मिळेल. उत्पादक ते पैठणी निर्माता असे थेट संबंध प्रस्थापित होऊन दोघांची दलालांपासून सुटका होईल. 

स्वावलंबनाचा संकल्प; स्पर्धेत टिकण्यासाठी कंपनी स्थापण्याचा निर्धार 
मोलमजुरीतून काहीच साध्य होत नव्हते. त्यामुळे आम्ही सर्व अठरापगड जातींच्या महिलांनी एकत्रित येऊन स्वावलंबी बनण्याचा संकल्प केला. स्पर्धेत टिकण्यासाठी कंपनी सुरू करण्याचे ठरवले असून तो प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. त्यास तातडीने मंजुरी मिळावी, अशी मागणी शशिकला वाघमारे, शमीना शेख, सुनीता बोंबले, राजश्री कातारे, जया शेळके, मंगल पवार, वंदना कुटे, सविता बाबर यांनी केली आहे. 

मुद्रा कर्ज
मेक इन इंडियाअंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने व्यवसायवृद्धीसाठी प्रति महिला ५० हजार रुपये मुद्रा कर्ज दिले. बँकेच्या वतीनेदेखील महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...