आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात सापडला 620 कोटींचा ब्लॅकमनी; औरंगाबादेत 120 तर जालन्यात 300 कोटींचे घबाड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबाद आयकर विभागाने काळ्या पैशाचा शोध घेत मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांतून सुमारे सहाशे कोटी इतका काळा पैसा जप्त केला आहे. यापैकी एकट्या  जालना शहरातून  सुमारे ३००  कोटी तर औरंगाबाद शहरातून १२० कोटी रुपयांचे  काळे धन सरकारजमा झाले. सप्टेंबर २०१६ ते मे २०१७ या कालावधीतील शोधमोहिमेतून हे काळे धन समोर आले आहे. जून आणि जुलैची गोळाबेरीज अजून बाकी आहे.

केंद्र सरकारने नोटबंदीच्या खूप आधी एप्रिल ते सप्टेंबर २०१६ मध्ये इन्कम डिक्लेरेशन स्कीम (आयडीएस)योजना जाहीर केली होती.त्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी नोटबंदी जाहीर झाली. देशभर प्राप्तिकर खात्याने राबवलेल्या या मोहिमेत देशभरातील १८ लाख लोकांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यात मराठवाड्यातील एक लाख लोक रडारवर होते. औरंगाबाद, जालना शहरात २५ हजार लोकांच्या खात्यांची कुंडली हाती आली होती. याच माेहिमेतून प्रथमच हा आकडा बाहेर आला आहे.

एप्रिल २०१७ मध्ये जालना शहरात एकाच दिवशी २१ धाडी या विभागाने घातल्या. त्यातून २३ कोटी रुपये इतका काळा पैसा बाहेर आला होता. नोटबंदी होताच काळा पैसा बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले. हा पैसा पांढरा करून व्यवहारात आणण्यासाठी सोने-चांदीच्या खरेदीसह इतर अनेक युक्त्या या लोकांनी वापरल्या. मात्र या व्यवहारांवर प्राप्तिकर खात्याची बारीक नजर होती. त्यानुसार सराफा व्यवहारांचातपशील पद्धतीने जमा करण्यात आला.

४० लाखांच्या वरील व्यवहार तपासले
नोटबंदी होताच ८ ते १८ नोव्हेंबर२०१७  या फक्त दहा दिवसांत झालेल्या व्यवहारांच्या अनुषंगाने अनेकांची खाती तपासली गेली. यातही प्रािप्तकर विभागाने अतिलठ्ठ व्यवहार झालेल्या खात्यांवर नजर ठेवली. त्यांची सखोल चौकशी सुरू केली. त्या आधीपासूनच अनेक खात्यांवरही नजर ठेवण्यात आली होती. हा सर्व डेटा दिल्लीत पाठवण्यात आला. तेथूनच प्रत्येक खात्याचा तपशील विभागवार मुख्य प्रािप्तकर आयुक्तांना पाठवला गेला. मराठवाड्यातील १ लाख ८४ हजार प्राप्तिकर दाते असले तरी त्याव्यतिरिक्त हजारो खाती बारकाईने तपासण्यात आली. यात जनधन योजनेतील खात्यांचाही समावेश आहे. दरम्यान, संशयित व्यवहार झालेल्या मराठवाडाभरातील १४५ सहकारी बँकांना नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. या माहिती मधूनदेखील काळेधन शोधण्यात मदत झाली.

टार्गेट हजार कोटींचे
मराठवाड्यात १ लाख ८४ हजार प्राप्तिकर दाते आहेत. त्याचे टार्गेट १ हजार कोटी रुपयांचे आहे. यंदा ते टार्गेट तर पूर्ण होईलच. त्याअाधी काळ्या पैशातून जानेवारीअखेरपर्यंत पाचशे कोटी वसूल झाले आहेत. हा आकडा मार्चअखेरपर्यंत आठशे कोटींवर जाईल, असा विश्वास या खात्यातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

स्रोत शोधण्यासाठी जनधनची चाचपणी
हजारो जनधन खाती या मोहिमेत तपासण्यात आली. शिवाय नोटबंदीनंतर अचानक मोठ्या रकमा ज्या खात्यांवर आल्या अशा खात्यांची यादी  विभागाने तपासली. जनधन खातेदारापेक्षा या खात्यांवर ज्या स्राेतांकडून पैसे आले त्यांचा शोध घेण्यात आला.

कोचिंग क्लास, बिल्डर, बियाणे व्यापारी, सराफांकडून सर्वाधिक वसूल :  सर्वाधिक काळेधन ग्रामीण भागात बियाणे व्यापारी आणि सराफांकडून  तर शहरांत बिल्डर,कोचिंग क्लास चालकांकडून वसूल करण्यात आले. या सर्वांच्या अर्थिक कुंडल्यावर बारीक नजर होती. गोपनीय पध्दतीने सुरुवातीला सर्व्हेक्षण करूनच हे काळेधन बाहेर आले. यात व्यापाऱ्याचे नाव, पत्ता हे सर्व गोपनीय ठेवण्यात आले आहे

रक्कम ९०० काेटीपर्यंत
औरंगाबाद प्राप्तिकर आयुक्तालयाच्या अखत्यारीत औरंगाबादसह जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद हे जिल्हे येतात. एकट्या जालना शहरातून सुमारे ३०० कोटी तर उर्वरित सर्व जिल्ह्यांतून सुमारे ३२० कोटींचा काळा पैसा वसूल करण्यात प्राप्तिकर विभागाला यश आले. सप्टेंबरअखेरपर्यंत हा आकडा ९०० कोटींपर्यंत जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.