आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूग्रस्त भागांत तापाच्या रुग्णांची संख्या 622

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी आणि प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी मनपाने सुरू केलेल्या मोहिमेत आतापर्यंत दोन लाख घरांचे सर्वेक्षण झाल्याचा दावा मनपाने केला असला तरी त्यांच्याच नोंदीनुसार मागील पाच दिवसांत तापांच्या रुग्णांची संख्या 622 पर्यंत पोहोचली आहे. दरम्यान, मनपाने आपल्या रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभागाची वेळ एक तासाने वाढवली आहे.
डेंग्यूने तीन बळी घेतल्यावर आणि ‘दिव्य मराठी’ने मनपाच्या कारभारावर कोरडे ओढल्यावर 2 ऑगस्टपासून व्यापक मोहीम मनपाने हाती घेतली आहे. या मोहिमेत गेल्या पाच दिवसांत मिळून दोन लाख घरांचे सर्वेक्षण करण्यात आल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.संध्या टाकळीकर यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या पाच दिवसांत ज्या भागांत मोहीम घेण्यात आली त्या भागात दिवसागणिक तापाच्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. दोन तारखेला तापाचे 88 रुग्ण आढळले होते. त्यानंतर त्यात रोज भर पडत असून आजच्या मोहिमेअखरे तापाच्या रुग्णांची संख्या 622 वर पोहोचली आहे.

रुग्णालयांत सोय नाही
महानगरपालिकेच्या रुग्णालयांत डेंग्यूच्या रुग्णांवर उपचार करण्याची सोय नसल्याने त्यांना भरती करून घेतले जात नाही. त्यामुळे घाटी किंवा खासगी रुग्णालयांत त्यांना धाव घ्यावी लागत असून महागड्या उपचारांचा भुर्दंड पडत आहे. दुसरीकडे आज मनपाने जाहीर केले की उद्यापासून मनपाच्या सर्व रुग्णालयांच्या ओपीडी एक तास अधिक सुरू असतील. आता सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत या ओपीडी सुरू राहतील. एन 8 व एन 11 मधील रुग्णालयांत तर दुपारी 3 ते 5 यावेळातही ओपीडी सुरू राहणार असल्याचेडॉ. टाकळीकर यांनी सांगितले.