आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

६५% औरंगाबादकरांचे मतदान, आज फैसला, दगडफेक-वादावादीच्या तुरळक घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापालिकेच्या १११ वॉर्डांसाठी बुधवारी सुमारे ६५ टक्के मतदान झाले.काही ठिकाणी दगडफेक आणि वादावादीचे प्रसंग वगळता मतदान शांततेत पार पडले.

सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात होताच नागरिकांनी सर्वच केेंद्रांवर रांगा लावल्या होत्या. त्यामुळे नऊ वाजेपर्यंतच १८ टक्के मतदान झाले होते. दुपारच्या सत्रात ऊन वाढले तरी आकाश ढगाळले होते. त्यामुळे सायंकाळी चारनंतर पुन्हा मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या. भवानीनगर वॉर्डात रात्री आठपर्यंत लोकांनी मतदानाचा हक्क बजावला.

कुठे झाल्या चकमकी
शिवाजीनगर (भारतनगर), गणेश कॉलनी येथे बोगस मतदानावरून चकमकी उडाल्या. शिवाजीनगरात तर दगडफेकीत दोघेजण जखमी झाले. तेथे पोलिसांना लाठीमार करावा लागला. गणेश कॉलनीत एमआयएम- काँग्रेस समर्थकांत हाणामारी झाली. पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल केला. बनावट मतदानाचा प्रयत्न, कर्मचा-यांशी वादावादी, मतदान केंद्राच्या आवारात अरेरावी करणे आदी प्रकरणी आचारसंहिता भंगाचे २९ गुन्हे दाखल झाले आहेत.

आज मतमोजणी
गुरुवारी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू हाेईल. ताठे मंगल कार्यालय, मौलाना आझाद संशोधन केंद्र, डॉ. आंबेडकर कॉलेज, हॉटेल सॉल्टसमोरील बॅडमिंटन कोर्ट, एमजीएम, गरवारे स्टेडियम बॅडमिंटन हॉल, एन-२ सिडको कम्युनिटी सेंटर, सेंट फ्रान्सिस, आयटीआय, यशवंत कॉलेज - गारखेडा, संत तुकाराम नाट्यगृह, सिडको येथे मोजणी होईल. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व अंतिम निकाल हाती येतील.

शाई संपल्याने अर्धा तास खोळंबा
मतदान केल्याची खूण म्हणून मतदाराच्या बोटाला शाई लावली जाते. त्यासाठी यंदा निवडणूक आयोगाने विशिष्ट पेन दिले होते. विश्रांतीनगर वॉर्डातील दोन मतदान केंद्रांवर पेनातील शाई संपल्याने अर्धा तास मतदान खोळंबले.

संवेदनशील केंद्रे शांत
पोलिसांनी हर्सूल, कटकट गेट, गोकुळनाथ मोहल्ला, जिन्सी, किराडपुरा आदी भागांतील ३१ मतदान केंद्रे संवेदनशील व खाराकुवा, बायजीपुरा, चिकलठाणा, गांधीनगर, राजनगर येथील ११ केंद्रे अतिसंवेदनशील घोषित केली होती. प्रत्यक्षात या केंद्रांवर काहीच घडले नाही. तणाव, वादावादीच्या घटना शिवाजीनगर, गणेश कॉलनीत घडल्या.