आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील ७० टक्के सीसीटीव्ही कॅमेरे बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहराची संवेदनशील ओळख लक्षात घेता येथे रस्त्यावर जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पोलिस दलाच्या आढावा बैठकीत केली होती. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत काय स्थिती आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘दिव्य मराठी’ने केला. तेव्हा नवीन कॅमेऱ्यांची गरज असली तरी सध्या बसवलेल्या कॅमेऱ्यांपैकी ७० टक्के कॅमेरे दुरुस्तीअभावी बंद असल्याचे समोर आले.

गेल्या काही वर्षांपासून व्यापारी, उद्योजक तसेच अन्य सामाजिक संस्थांच्या वतीने पोलिसांना मदत म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे देण्यात आले आहेत. कॅमेरे खरेदीसाठी प्रायोजकत्व घेतलेल्या व्यापारी, उद्योजकांनी नंतर देखभाल दुरुस्ती केली नाही. त्यामुळे ७० टक्क्यांपर्यंत कॅमेरे गेल्या काही महिन्यांपासून बंद आहेत. आहे ते कॅमेरे बंद असतानाच आणखी कॅमेरे बसवा, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. नवीन कॅमेरे बसतील व नंतर त्यांचेही अशी अवस्था होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सीसीटीव्हीचे फायदे
एखादी घटना घडल्यानंतर आरोपींचा माग काढणे सोपे होते. दहशतवादाची शहरावर छाया आहे. अशा परिस्थितीत संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे सोपे जाऊ शकते.
शहरात ठिकठिकाणी २०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. यासाठी व्यापारी, उद्योजकांची मदत घेण्यात आली होती. शहरातील ४० पेक्षा अधिक चौकांमध्ये हे कॅमेरे बसवण्यात आले होते. शहरातील मुख्य बाजारपेठेतही कॅमेरे आहेत. सर्व प्रमुख रस्ते, चौक, बाजारपेठा, उद्याने, मैदाने, शाळा, महाविद्यालये व महत्त्वाची स्थळे आदी ठिकाणी कॅमेरे असावेत, असे पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी पाठवलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.

पोलिसांकडे तरतूद नाही
प्रायोजकांकडून कॅमेरे मिळाले, मात्र त्यांची दैनंदिन देखभाल व दुरुस्तीसाठी पोलिसांकडे तरतूद नाही. त्यामुळे हे कॅमेरे बंद पडले आहेत. म्हणजे नवीन कॅमेरे शहरात लावले जाणार असतील तर त्यासाठी दुरुस्तीसाठीही खर्चाची तरतूद असणे आवश्यक आहे.

कॅमेरे सुरू राहावेत
शहरात आणखी सीसीटीव्ही कॅमेरे हवेत. सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. ते मिळतील, पण त्याचबरोबर दुरुस्तीसाठी निधीची गरज आहे. कॅमेरे कायम सुरू असले पाहिजेत.
राजेंद्र सिंह, पोलिस आयुक्त.
देखभाल गरजेची
शहरात धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखभाल करणे अत्यंत गरजेचे असते. जर नियमित दुरुस्ती झाली नाही तर ते नादुरुस्त होतात. वेळोवेळी सर्व्हिसिंग झाली तर ही अडचण उद््भवत नाही.
मनोज संतान्से, सीटीव्ही कॅमेरा विक्रेते.