आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायापडणीत आलेले 70 हजार नवदांपत्याने केले दान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - आजघडीला अनेकजण लग्नावर मोठ्या प्रमाणात खर्च करून धूमधडाक्यात लग्न करणारांची संख्या आहे, परंतु अवाढव्य लग्न न करता त्या खर्चातून वंचितांना मदत करणारे बोटावर मोजण्याइतकेच पाहायला मिळतात. त्यातीलच एक गणेश झाडे व दीपाली झाडे हे नवदांपत्य आहे. चंद्रपूर येथे झालेल्या विवाह सोहळ्यानंतर ज्येष्ठांच्या पायापडणी ओवाळणीतून आलेले ७० हजार ४४३ रुपये आदिवासी शाळा, वंचित विद्यार्थ्यांसाठी दान करून तरुणांसाठी प्रेरणा देणारा आदर्श उभा केला आहे. 
 
आजच्या स्पर्धेच्या युगात सारेच इतरांपेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. प्रगती करताना अनेकजण सामाजिक बांधिलकी विसरून जातात. पैशामुळे भौतिक सुखापेक्षा सामाजिक कार्यातून मानसिक समाधान मोठ्या प्रमाणात मिळते. या उक्तीप्रमाणे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या चंद्रपूर येथील गणेश झाडे यांनी त्यांच्या लग्नात अवाढव्य खर्च टाळला. या खर्चातून वंचितांना कशी मदत होईल, यासाठी लग्न सोहळ्याच्या दिवशी आप्तेष्ठांनी दिलेली आर्थिक भेट विविध संस्थांना दान करून दिली. यामुळे या दांपत्याचा हा सोहळा आगळा-वेगळा ठरला आहे. ही रक्कम विविध संस्थांना वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.  

या संस्थांना मदत   
वंचित घटकांतील अनाथ, विद्यार्थी, ज्येष्ठांना विविध संस्थांमार्फत जगविण्याचे काम केले जात आहे. या संस्थांना आर्थिक पाठबळ मिळावे, म्हणून हेमलकसा येथील लोक बिरादरी, मंगरूळ येथील प्रश्नचिन्ह आदिवासी शाळा, चिखली येथील सेवा संकल्प प्रतिष्ठान, आर्वी येथील भवानी विद्यार्थी कल्याण प्रतिष्ठान, पंढरपूर येथील पालवी, समर्पण प्रतिष्ठान यांच्या प्रत्येकी संस्थेमार्फत दहा हजार, वाशिम येथील चेतन सेवांकुर आर्केस्ट्राॅ ५ हजार ७५०, बुलडाणा येथील छत्रछाया फाउंडेशन, गेवराई येथील आई फाउंडेशनला प्रत्येकी ५ हजार अशी ७० हजार ४४३ रुपयांची आर्थिक मदत केली आहे.  
 
एक वेगळा उपक्रम   
तरुणांनी समाजाप्रती देणं या उद्देशाने काम करावे. प्रत्येक तरुणात सामाजिक बांधिलकी असावी. त्यातूनच समाजाचा विकास होईल. कुठलेही काम करताना हेतू शुद्ध असावा. त्यातून मिळणारे समाधान पुरस्कारापेक्षा मोठे असते - गणेश व दीपाली झाडे, नवदांपत्य, चंद्रपूर.  

प्रेरणा देणारी वाटचाल   
गणेश झाडे या दांपत्याने लग्न सोहळ्यातील रक्कम वंचित घटकांसाठी दान करून प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे. या उपक्रमाचा नवतरुणांनी आदर्श घेऊन समाजाप्रती सकारात्मक भावना वाढवावी - अजय किंगरे, अध्यक्ष, मैत्र मांदियाळी, जालना.  
 
आमटे कुटुंबीयांकडून गौरव   
वंचितांसाठी मदत केल्यामुळे या दांपत्याचा प्रकाश आमटे व मंदा आमटे यांच्या हस्ते गौरव करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कुटुंबीयांनी प्रश्नचिन्ह शाळेच्या बांधकामालाही मदत केली आहे.
 
बातम्या आणखी आहेत...