आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील जुन्या भागात ७२ धोकादायक इमारती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी मनपाने पावसाळ्याच्या तोंडावर धोकादायक इमारतींकडे लक्ष वळवले आहे. शहरातील खासकरून जुन्या भागातील धोकादायक इमारतींची संख्या ७२ वर पोहोचली असून ३५ इमारती मोडकळीला आल्या आहेत. या इमारतींवर आठवडाभरात कारवाई करण्यात येणार आहे.

पावसाळा आला की मनपाच्या वतीने धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. अशा इमारती रिकाम्या करून घेणे अथवा पाडून टाकणे अशा प्रकारची मनपा कारवाई करीत असते. गतवर्षी ७५ इमारती धोकादायक गणल्या गेल्या होत्या. त्यापैकी १२ इमारतींना मनपाने सील लावले होते, तर १० जणांनी आपणहून आपल्या इमारती पाडल्या होत्या. मनपाने पाच अति धोकादायक इमारती पाडल्या होत्या.

यंदादेखील मनपाच्या पथकाने शहरातील धोकादायक इमारतींची पाहणी करून त्यांची यादी तयार केली आहे. शहराचा जुना भाग समाविष्ट असणार्‍या प्रभागात सर्वाधिक २१ इमारती आहेत. यंदा ७२ इमारती धोकादायक आढळल्या असून त्यापैकी ७० इमारती सील करण्यात येणार असल्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन यांनी सांगितले. ते म्हणाले की, पाच सर्वाधिक धोकादायक इमारती पाडण्यात येणार आहेत. या यादीतील ३५ इमारतींना पुढील आठवड्यात नोटीस बजावण्यात येणार आहे. सील केलेल्या इमारतींवर मनपा लाल अक्षरात "धोकादायक इमारत' असे लिहिणार आहे, असेही ते म्हणाले.

या धोकादायक इमारतींपैकी काहींच्या मालकांनी न्यायालयात धाव घेतली असून तेथून त्यांनी कारवाईला स्थगिती मिळवली आहे. त्यामुळे मनपाच्या वतीने न्यायालयासमोर नव्याने बाजू मांडली जाईल. या इमारती रहदारीच्या रस्त्यावर असल्याने अतिशय धोक्याची स्थिती निर्माण होऊ होते. जीवित वित्तहानीचा धोका लक्षात घेऊन या इमारती सील करण्याची परवानगी मनपा न्यायालयाकडे मागणार आहे.