आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

७२ टक्के महिला म्हणाल्या, डान्स बारवर बंदी घालावीच !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डान्सबार बंदीच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय आणि कौटुंबिक क्षेत्रात वादळी चर्चा सुरू झाली आहे.
डान्स बार बंदच राहावेत यासाठी निश्चित पावले उचलली जातील, असे सरकारकडून सांगण्यात येत असतानाच समाजातील एका गटाने डान्स बारवर बंदी नको, असाही सूर लावला आहे.
सामाजिक स्थैर्य आणि कुटुंबव्यवस्था अबाधित राहण्याच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांनी डान्स बार पुन्हा सुरू करण्यास कडाडून विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रातील महिलांना काय वाटते हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘दिव्य मराठी’ने सर्वेक्षणाद्वारे केला. तेव्हा सरकारने डान्स बारवर बंदी घालावी, असे ७२ टक्के महिलांनी ठणकावून सांिगतले, तर २८ टक्के महिला म्हणाल्या, प्रत्येक व्यक्तीला घटनेनेच कामाचा अधिकार दिला आहे. तो लक्षात घेता त्यांच्यासाठी डान्सबार सुरू झाले पाहिजेत. बारमध्ये नाचून काही महिला कमाई करत असतील, कुटुंबाचे पोट भरत असतील तर त्यात गैर काहीच नाही. मात्र, असे बार सुरू करताना कडक, नियम अटी असाव्यात, असे त्यांनी म्हटले. प्रत्येक शहरात वेश्याव्यवसाय सुरू आहे त्याचे काय, असा सवालही त्यांनी केला.

सर्वेक्षणात यांचा सहभाग
गृहिणी, नोकरदार, प्राध्यापक, शिक्षक, महाविद्यालयीन युवती, पोलिस कर्मचारी, वकील, सामाजिक कार्यकर्त्या, राजकीय कार्यकर्त्या, अभियंता, डॉक्टर आदी क्षेत्रांतील महिलांचा सर्वेक्षणात समावेश होता.

28%- बंदी नको; नियम ठरवा ...
-महिलांच्या काम करण्याच्या अधिकारावर आक्रमण करणे योग्य नाही.
-वेश्याव्यवसाय तर प्रत्येक शहरात राजरोस सुरूच आहे.
-काही नियम-अटी टाकून डान्सबार असावेत.
-महिलाही जाऊ शकतील असे डान्सबारमधील वातावरण असावे.
-देवस्थानांकडील पैसाही बारगर्लच्या कुटुंबांना देऊन त्यांना सन्मानाने जगण्यासाठी मदत करावी.

72% - सरकारने बंदी घालावी...
-डान्सबारमुळेमद्यपींचे प्रमाण वाढेल.
-अनेक पुरुष रात्रभर घराबाहेरच राहतील.
-कुटुंबव्यवस्था मोडून पडेल.
- गुन्हेगारी फोफावेल.
-काळा पैसा कमावण्याची स्पर्धा वाढेल.
- सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार शिगेला पोहोचेल.
- कामाच्या अधिकारापेक्षा कुटुंबाचे भवितव्य महत्त्वाचे आहे.

असे केले सर्वेक्षण
‘दिव्यमराठी’ प्रतिनिधींनी विविध क्षेत्रांत कार्यरत महिलांशी संपर्क साधला. डान्सबार बंदीच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याचे वृत्त तुम्ही वाचले आहे काय? अशी विचारणा केली. ज्या महिलांनी वृत्त वाचले किंवा न्यूज चॅनलवर बातमी पाहिल्याचे सांिगतले त्यांना पुढील तीन प्रश्न विचारले.

सरकारने डान्सबारवर बंदी घालावी का?
डान्सबार म्हणजे उपजीविकेचे साधन आहे, असे डान्सबारमध्ये काम करणाऱ्या महिलांचे म्हणणे आहे. ते योग्य वाटते का?
डान्सबारवर बंदी घालावी असे वाटत असेल तर त्यामागची कारणे काय? बंदी घालू नये, असे वाटत असल्यास त्यामागील कारणे काय?