आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 72 Thousand Stolen After Beating Seven Men, Divya Marathi

सात जणांना मारहाण करून ७२ हजारांचा ऐवज लुटला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर स्टेशन - गंगापूर तालुक्यातील गवळी धानोरा शिवारातील दोन शेतवस्त्यांवर सोमवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी मोरे वस्तीवर राहणा-या दोन कुटुंबीयांतील सात जणांना जबर मारहाण करत वस्तीवरील एका घरात सर्वांना कोंडून ठेवले. तेथे अर्धा तास धुमाकूळ घालून त्याच्याकडील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख आठ हजार रुपये असा एकूण ७२ हजारांचा ऐवज पळवून नेला.
यातील सात जखमींना पोलिसांनी पहाटेच घाटी रुग्णालयात हलवले. यापैकी पाच जणांवर किरकोळ उपचार करून परत पाठवण्यात आले, तर गंभीर जखमी असल्याने एका महिलेसह अन्य एकावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शिल्लेगाव पोलिस ठाण्यात चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी चार अज्ञात चोरट्यांनी मोरे वस्तीवर राहणा-या दोन घरातील कुटुंबीयांना झोपलेले असताना उठवून शस्त्राचा धाक दाखवून गज, कुऱ्हाडीने जबर मारहाण करून महिलांच्या अंगावरील दागिने हिसकावून घेत सर्वांना एका घरात कोंडून चोरटे पसार झाले. हा सर्व धुमाकूळ अर्धा तास सुरू होता. दरम्यान, वस्तीवर एका कुत्र्यालादेखील चोरट्यांनी जखमी केले. या घटनेतील जखमींची नावे अशी : भिका राजुळे (५७), संतोष राजुळे (३०), भगवान मोरे (३०), कासाबाई असाराम मोरे (५५), भीमाबाई भिका राजुळे (५३), सुनीता गिरजाराम माडवगड (३२), मुक्ताबाई भगवान मोरे (२८) सर्व राहणार गवळी धानोरा वस्ती.

घटनास्थळी शिल्लेगावचे सहायक पोलिस निरीक्षक निमिष मेहेत्रे, फौजदार अश्रुबा घाटे, अशोक गंगावणे, दादाराव पवार, दिलीप बिरारे, भीमराव सातदिवे आदींसह गंगापूरच्या उपविभागीय पोलिस अधिकारी जयश्री देसाई, गुन्हे शाखेचे के. के. पाटील, दरोडा पथकाचे मुंडे तसेच श्वानपथकालादेखील पाचारण करण्यात आले होते. या घटनेमुळे शेतवस्त्यावर राहणा-या शेतक-यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
( छायाचित्र: गवळी धानोरा येथे चोरी करणा-या चोरट्यांनी घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले होते.)