आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद शहरातील रस्त्यांसाठी पहिला टप्पा ७५ कोटींचा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी औरंगाबाद शहरातील रस्त्यांसाठी ७५ कोटी रुपये मिळणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. महापौर भगवान घडामोडे यासाठी प्रयत्नशील होते. कामाच्या व्यापाच्या लगीनघाईतही त्यांनी रस्त्यांच्या निधीसाठी मागणीचा पाठपुरावा करताना दुर्लक्ष केले नाही. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळपर्यंत निधी वितरित होण्याचा शासन निर्णय जारी होऊ शकतो. दोन वर्षांपूर्वी महानगरपालिकेने राज्य शासनाकडे रस्ते विकासासाठी २६५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. मात्र एकाच वेळी एवढा निधी देण्यास शासनाने ना मनाई केली ना निधी दिला. नंतर जेव्हा स्थानिक आमदारांनी पाठपुरावा केला तेव्हा ३६५ नव्हे, तर १५० कोटी रुपये मिळतील आणि तेही तीन टप्प्यांत असे स्पष्ट केले होते. पहिल्या टप्प्यात ५० कोटी रुपये रस्त्यांसाठी मिळणार, असे आमदार अतुल सावे यांनी जाहीरही केले होते. परंतु प्रत्यक्षात पहिल्या टप्प्याचा निधी काही हाती आली नाही. 

महापौरपदी विराजमान झाल्यानंतर घडामोडे यांनी वर्दळीच्या नि प्रमुख रस्त्यांच्या विकासाला प्राधान्य दिले. माझ्या ११ महिन्यांच्या कारकीर्दीत मोठी अपेक्षा ठेवता मोजक्याच रस्त्यांचे चांगले काम मी करणार, असे त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. आता त्यांच्या या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसू लागले आहे. घडामोडे यांनी याच मागणीसाठी दोन वेळा मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. तसेच ते जेव्हा जेव्हा शहरात आले तेव्हा त्यांच्याकडे पालिकेच्या वतीने अधिकृतपणे निवेदनही दिले होते. 

अखेर त्यांच्या मागणीला यश आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले असून पहिल्या टप्प्यात ५० कोटींऐवजी ७५ कोटी रुपये देण्याचे मान्य करण्यात आल्याचे समजते. रस्त्यांच्या नावासह हा निधी पुढील चार दिवसांत पालिकेच्या तिजोरीत जमा होण्याची शक्यता आहे. महापौर घडामोडे यांच्याशी संपर्क साधला असता ‘हिवाळी अधिवेशनापूर्वी हा निधी मिळू शकतो’ असे त्यांनी म्हटले आहे. निधी प्राप्त होताच निविदा प्रक्रिया हाती घेऊन लवकरात लवकर रस्त्यांची कामे हाती घेतली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. 

पहिल्या टप्प्यात नेमक्या कोणत्या रस्त्यांची कामे होतील हे घडामोडे यांनी सांगितले नाही. शासनाकडे आम्ही रस्त्यांची यादी दिली होती. त्यातून कोणत्या रस्त्यासाठी त्यांनी निधी दिला हे शासनादेशात स्पष्ट होईल आणि शासनादेशानुसार रस्त्यांची कामे होतील, असे घडामोडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...