आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 8 Cabinet Minister At Maharashtra, News In Marathi

राज्याला आठ मंत्रिपदे; मुंडेंना कृषी, गडकरींना नगरविकास खाते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळातील 28 कॅबिनेट व 6 राज्यमंत्र्यांच्या नावांची यादी तयार असून महाराष्ट्रातून भाजपचे नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, हंसराज अहिर, किरीट सोमय्या यांची नावे अग्रक्रमावर आहेत. रिपाइंचे रामदास आठवले व राजू शेट्टी यांनाही राज्यमंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शिवसेनेला दोन कॅबिनेट व दोन राज्यमंत्रिपदे देण्याचे निश्चित झाले असले तरी सोमवारी पहिल्या टप्प्यात मराठवाड्याला प्रतिनिधित्व दिले जाण्याची शक्यता नसल्याचे वृत्त आहे. राज्याला या टप्प्यात आठ मंत्रिपदांचा वाटा मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.

शिवसेनेचे अनंत गिते आणि आनंदराव अडसूळ हे जसे मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत तसेच मराठवाड्यातून चौथ्यांदा खासदार झालेले चंद्रकांत खैरे यांचे नावही शर्यतीत आहे. यातून नेमक्या कोणत्या दोन नेत्यांना कॅबिनेट मिळणार याबद्दल अजूनही कमालीची उत्सुकता आहे. भाजपच्या तिकिटावर चौथ्यांदा निवडून आलेले रावसाहेब दानवे यांचेही नाव केवळ चर्चेतच आहे.

गडकरींना नगरविकास व परिवहन, चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर यांना कोळसा तर शिवसेनेचे अमरावतीतील खासदार आनंदरराव आडसुळ यांच्या वाट्याला अवजड उद्योग मंत्रीपद येण्याची शक्यता आहे. आठवले यांना सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्रिपद मिळू शकते. दानवे यांना भाजपकडून तर खैरेंना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रीपदे मिळण्याची आशा आहे. मात्र संभाव्य यादीत तुर्त तरी त्यांचे नावे नाहीत. महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणूकीत पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीची कोंडी करण्यासाठी मुंडेंना कृषि व राजू शेट्टी यांना याच खात्याचे राज्यमंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे.

संभाव्य मंत्र्यांची नावे आणि विभाग
राजनाथ सिंह-गृह, सुब्रमण्यम स्वामी-अर्थ, अरूण जेटली-विदेश मंत्री, सुषमा स्वराज-संरक्षण मंत्री, नितीन गडकरी-नगरविकास व वाहतूक, गोपीनाथ मुंडे-कृषी, डॉ. हर्षवर्धन-सार्वजनिक आरोग्य, रवीशंकर प्रसाद-कायदा, एस. एस. अहुलुवालिया-वाणिज्य, अनंतकुमार-दुरसंचार, बी. एस येदियुरप्पा-मनुष्यबळ विकास, हंसराज अहिर-कोळसा, रामविलास पासवान-पेट्रोलियम, शाहनवाज हुसैन-हवाई वाहतुक, मुख्तार अब्बास नकवी-अल्पसंख्याक कल्याण, सुमित्रा महाजन-संसदीय कार्य, अनुप्रिया पटेल-महिला व बालकल्याण, पुरुषोत्तम रुपाला-जलस्रोत, कीर्ती आझाद-क्रीडा, र्‍यापाद नाईक-पर्यटन, मीनाक्षी लेखी-सांस्कृतिक कार्य, जगदंबिका पाल-माहिती व प्रसारण, कंपनी व्यवहार-अनुराग ठाकूर, बी. सी. खंडुरी-अपारंपारीक ऊर्जा, राजीव प्रताप रूडी-अनिवासी भारतीय, बंडारू दत्तात्रय-सामाजिक न्याय

अधिकारी, खेळाडूंना राज्यमंत्रिपदे
मुंबई पोलिस आयुक्त पदावरून निवृत्ती पत्करलेले व बागपतमध्ये अजित सिंह यांना पराभूत करणारे आयपीएस सत्यपाल सिंह यांना गृह राज्यमंत्रिपद तर निवृत्त लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांना संरक्षण राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. राजवर्धन राठोड या खेळाडूला क्रीडा राज्यमंत्रिपद दिले जाऊ शकते.