आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 8 Farmers Committed Suicide In Vidarbh Marathwada

ऐन संक्रांतीच्या सणालाच विदर्भ-मराठवाड्यात ८ शेतक-यांची आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/नागपूर - दुष्काळाच्या पॅकेजचे शेतक-यांना वाटप सुरू असतानाच राज्यात पुन्हा आठ शेतक-यांनी ऐन संक्रांतीचा सण साजरा होत असतानाच आत्महत्या केल्या आहेत. कष्टाने पिकवलेला कांदा बेभाव विकावा लागल्याने वैजापूर तालुक्यात बाभूळगाव खुर्द येथील संदीप कैलास तुपे या २६ वर्षीय शेतक-याने शेतात विष घेऊन आत्महत्या केली. उस्मानाबादच्या कळंब तालुक्यातही बोरगाव येथे रानेश लक्ष्मण सांगळे (३०) यांनी शुक्रवारी गळफास घेतला. विदर्भातही ६ शेतक-यांनी आत्महत्या केली आहे.

गारजजवळील बाभूळगावचे संदीप तुपे यांनी गुरुवारी लासूर येथे कांदा विकला. क्विंटलला सुमारे ८५० रुपयांचा भाव असतानाही त्यांना मात्र ४५० रुपयांत तो विकावा लागला. उत्पादन खर्चही निघाला नाही. दहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेले संदीप हे घरात एकुलते एक होते.
कळंब तालुक्यातील रानेश यांना अडीच एकर शेती असून, अवर्षणामुळे कापूस हातचा गेल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे.

विदर्भात अमरावतीच्या शहापूरचे किशोर कांबळे, झाडगावचे संजय काळे, राजनाचे मारुती नेवारे, खु-याचे साहेबराव आखरे, यवतमाळच्या हिवरा येथील गोविंदसिंग बैस व चंद्रपूरच्या मोखाडाचे मंगेश जोगी यांनी आत्महत्या केली आहे. विदर्भात जानेवारीत २९ शेतक-यांनी जीवनयात्रा संपवली आहे, अशी माहिती विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी दिली.

खर्च-उत्पन्नातील तफावत
*वैजापूर तालुक्यातील संदीप तुपे यांनी एका एकरात मका घेतला. त्यासाठी सहा हजारांचा खर्च आला, मात्र उत्पन्न दोन हजारांचेच मिळाले. शिवाय कांदा व कापसाचेही तसेच झाले. या वैफल्यातूनच संदीप यांनी जीवनयात्रा संपवली.
*तीन एकरांत कपाशी लावली. ५० हजार रुपये खर्च आला. पण कापूस विक्रीतून अवघे १९ हजार रुपये मिळाले. यामुळे संदीप यांना नैराश्य आले.
*अर्ध्या एकरात १२ गोण्या कांदा झाला. तो विकून २७०० रुपये मिळाले. ८५० रुपये भाव असताना त्यांना ४५०च्या भावाने कांदा विकावा लागला.

१० गुंठे फुलशेती, ६ लाख उत्पन्न
औराळा | नापिकीमुळे एकीकडे शेतक-यांत नैराश्य असतानाच कन्नडच्या शिवराई येथे कैलास शिंदे व वाल्मीक कदम यांनी एकत्र येऊन १० गुंठे शेतात जरबेरा फुलशेतीतून ६ लाखांचे उत्पन्न काढले. दोघांनी ८ कि.मी.वरून पाणी आणून नियोजन केले. १२ हजार जरबेरा रोपांची लागवड केली. दोन महिन्यांनी रोज हजार फुले प्रत्येकी अडीच रुपये भावाने विकली. खर्च जाता त्यांना महिना ६० हजार रुपये मिळत आहेत.

शिवसेना ५० मुलींची लग्ने लावणार
औरंगाबाद | शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांचा दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या ५० मुलींचे कन्यादान करण्याचा संकल्प आहे. योजनेत मंगळसूत्र, वधू-वरांचे कपडे, संसारोपयोगी वस्तू, पंगतीचा खर्च केला जाईल. यासाठी एकच तारीख, स्थळ नसेल. गरजेनुसार त्या त्या गावात जाऊन लग्न लावले जाईल. एक हजार वऱ्हाडी अपेक्षित आहेत.