आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील 8 दुकानांना आग, कांचनवाडी, औरंगपुऱ्यात घडली घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अचानक आग लागल्याने शहरातील आठ दुकाने जळून भस्मसात झाली असून कांचनवाडी आणि औरंगपुरा भागात ही घटना घडली. या दोन्ही घटनांची संबंधित पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दोन्ही घटनांमध्ये मिळून सुमारे ३७ लाख रुपयांचे नुकसान झाले असून व्यापारी या घटनेमुळे हताश झाले आहेत.

कांचनवाडी येथे पहाटे साडेतीन वाजता ही घटना घडली. सात दुकानांना अचानक आग लागली. यात साहिल फोटो स्टुडिओकडून लागलेली आग कोमल हेअर कटिंग सलूनपर्यंत गेली. यात सात दुकाने आणि तीन घरे जळून खाक झाली. संजय सटवाजी जोडपे यांच्या मालकीचा साहिल डिजिटल फोटो स्टुडिओ जळून दोन लाखांचा ऐवज खाक झाला. प्रभाकर धोंडिबा भोसले यांच्या राजश्री लॉटरी दुकानात २२ हजार रुपये रोकडसह तीन लाख ५० हजारांचा ऐवज खाक झाला. सर्जेराव भुजंगराव राजपुरे यांच्या श्री इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिकमधील दोन लाख ५० हजारांचे नुकसान झाले आहे. प्रदीप नामदेव मोतिंगे यांच्या समर्थ इलेक्ट्रिकलमधील लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुमीत सुदाम पेरकर यांच्या या दुकानाचे सर्वात जास्त नुकसान झाले. किमती वस्तू खाक झाल्यामुळे तब्बल १५ लाख रुपयांचे साहित्य जळाले. सोनू अशोक शिंदे यांच्या दुकानात फर्निचर अन्य साहित्य जळून ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. सागर दत्तू बोरुडे यांचे सलूनचे दुकान जळून खाक झाले.

औरंगपुऱ्यात स्टेशनरी दुकान भस्मसात
दुसरीघटना औरंगपुरा भागात असलेल्या नाथ सुपर मार्केट येथे घडली. सकाळी सहाच्या सुमारास दत्तात्रय खामगावकर यांच्या डी. के. स्टेशनरी या दुकानाला आग लागली. दुकानात सर्व विक्रीसाठीचे सामान होते. या आगीत दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या दोन्ही घटनांत आग कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे. सातारा आणि क्रांती चौक पोलिस ठाण्यात या घटनांची नोंद करण्यात आली आहे.

कांचनवाडी, औरंगपुरा भागात दुकानांना आग लागली. यात मोठे नुकसान झाले. छाया : मनोज पराती