आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कृषी विकास: जलसंधारणासाठी आठशे कोटी रुपयांची तरतूद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राज्यातील ३३ जिल्ह्यांत जलसंधारणाची कामे केली जाणार असून त्यासाठी ८०० कोटी फलोत्पादन विकासासाठी २०५ कोटींची तरतूद करण्यात आल्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी विभागीय कृषी आढावा बैठकीत सांगितले.
एमआयटी कॉलजेच्या सभागृहात कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीला राज्य फलोत्पादन विभागाचे संचालक सुदाम अडसूळ, निविष्ठा गुणनियंत्रण विभागाचे राज्य संचालक जयंत देशमुख, जलसंधारण विभागाचे संचालक सुरेश अंबुलगेकर, विभागीय कृषी सहसंचालक जनार्दन जाधव, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, कृषी विकास अधिकारी सीताराम कोलते; औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा कृषी विकास अधिकारी, उपविभागीय, तालुका, पंचायत समितीचे कृषी अधिकारी उपस्थित होते.
बँक खात्यातच जमा करा : सरकारचे जे अनुदान शेतकऱ्यांसाठी येत आहे, ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यातच जमा करावे. कुणालाही चेक, डीडी स्वरूपात अनुदान वाटप करू नये, अशा सक्त सूचनाही देण्यात आल्या आहेत.
अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तत्काळ जमा करा
२०१३-१४ मधील रखडलेले सिंचन अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. ते त्वरित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश देशमुख यांनी दिले. मराठवाड्यासाठी १३५ कोटी ७४ लाख ५९ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ५२ हजार ८४० लाभार्थी शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. सिंचनासाठी भरीव मदत करण्याची सोय सरकारने केली आहे. माती परीक्षण करून खरिपाचे नियोजन करा निर्धारित वेळेत कामे करण्याचे निर्देशही देशमुख यांनी दिले.
बोगस बियाणे खते विकणाऱ्यांवर फौजदारी
दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे प्रभावीपणे करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यासाठी उद्दिष्टे देण्यात आली आहेत. त्यांची पूर्तता वेळेत करावी. बियाणे खते मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ते सर्व शेतकऱ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचवा. बोगस बियाणे खते विक्री करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा. कर्तव्यात कसूर केल्यास किंवा गैरप्रकाराकडे दुर्लक्ष केल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा देशमुख यांनी दिला.
बातम्या आणखी आहेत...