आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाला 90 लाखांची नोटीस बजावणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सिद्धार्थ उद्यानाच्या करमणूक करापोटी 90 लाखांचा भरणा करावा, अशी नोटीस विभागीय आयुक्तालयातील करमणूक शुल्क विभागातर्फे महापालिकेला दिली जाणार आहे. या उद्यानात प्रवेशासाठी वयस्कांकडून दहा तर लहानांकडून पाच रुपये वसूल केले जातात. त्यामुळेच मनपाने कर भरणे आवश्यक असल्याचे करमणूक शुल्क विभागीय उपायुक्त धनंजय केंद्रे यांनी स्पष्ट केले आहे.

2001-02 ते 2009-10 या कालावधीत उद्यानातून मनपाला दोन कोटी 90 लाख 48 हजार 420 रुपये, 2010-11 मध्ये 43 लाख 61 हजार 613 असे एकूण तीन कोटी 34 लाख 10 हजार 033 रुपये मिळाले. मुंबई करमणूक शुल्क अधिनियम 1923 मधील कलम 3 (1) ब नुसार प्रवेश शुल्काच्या रकमेनुसार 15 टक्के करमणूक कर 50 लाख 11 हजार 505 रुपये आहे.

थकबाकीवर 10 टक्के व्याजापोटी पाच लाख एक हजार 150 रुपये असे एकूण 55 लाख 12 हजार 655 रुपये इतकी रक्कम पालिकेकडून येणे आहे. एप्रिल 2011 पासून ही रक्कम भरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पालिकेला नोटिसांचा भडिमार केला आहे. त्यावर मनपाने माफीचे पत्र पाठवले. यावर आज वरिष्ठस्तरीय बैठकीत चर्चा झाली. 2011-12 नंतरच्या उत्पन्न आणि त्यावरील हिशोबाचा तपशील मांडून 90 लाख 8 हजार 267 रुपये भरण्याची नोटीस मनपा उद्यान अधीक्षकांना बजावण्याचा निर्णय झाला.

या संदर्भात केंद्रे म्हणाले की, मुंबई करमणूक शुल्क अधिनियम 1923 मधील कलम 2 अ 1 व कलम 3 1 ब च्या दुसर्‍या नियमानुसार सिद्धार्थ उद्यान मनोरंजन उद्यानाच्या व्याख्येत येते. त्यानुसारच कर आकारणी केली आहे. त्यांना त्यात माफी मिळणार नाही. तर उद्यान, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे म्हणाले की, उद्यानात दुर्मिळ वन्यजीवांचे जतन केले जाते. त्यासाठीचा खर्च नाममात्र शुल्कातून मिळतो. येथे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे. त्यामुळे नोटीस मिळाल्यावर आयुक्तांमार्फत जिल्हा प्रशासनाला पुन्हा कर माफीचे पत्र पाठवले जाणार आहे.