आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

९० % खरीप पेरणी पूर्ण, औरंगाबाद विभाग गळीत धान्य पेरणीत टॉपवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र १३९.६४ लाख हेक्टर असून त्यापैकी १२५.४० लाख हेक्टर (९०%) क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी पूर्ण झाली आहे. गळीत धान्य पेरणीत औरंगाबाद विभाग सर्वात पुढे असून कडधान्य, तृणधान्य व कपाशी लागवडीत दुसऱ्या स्थानी आहे. नागपूर विभाग कपाशी, पुणे कडधान्ये आणि कोल्हापूर तृणधान्य पेरणीत सर्वात पुढे आहे. सर्वच पिकांची स्थिती चांगली असून यंदा अपेक्षेपेक्षा ५ ते १० टक्क्यांनी उत्पादनात वाढ होण्याची शक्यता कृषितज्ज्ञांनी वर्तवली आहे.

औरंगाबाद विभागात भुईमूग, तीळ, कारळ, सूर्यफूल, सोयाबीन आणि इतर गळीत धान्यांची पेरणी २०२ टक्के, तर लातूर विभागात १४० टक्के झाली अाहे. अमरावती ११२, पुणे १०३, कोल्हापूर ९४, नाशिक ७७, नागपूर ४५ टक्के. एकूण ३५,६८,१०० हेक्टरपैकी ३९,१५,६०० म्हणजे ११० टक्के गळिताची पेरणी झालेली आहे.

तृणधान्यात कोल्हापूर पुढे : तृणधान्यात भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मक यांचा समावेश होतो. ४१,५७,७०० हेक्टरपैकी २६,६०,२०० हेक्टरवर म्हणजेच ६४ % पेरणी पूर्ण झाली असून विभागनिहाय कोल्हापूर १०२, औरंगाबाद ९४, पुणे ७५, नाशिक ७४, कोकण ५९, अमरावती ५७, लातूर ४४ व नागपूर २२ % पेरणी झाली आहे.सरासरी क्षेत्र नाशिकचे जास्त असून त्यानंतर नागपूर व उर्वरित सर्व विभागाचे क्षेत्र जवळपास सारखेच आहे.
कडधान्य पेरणीत औरंगाबाद दुसरे
तूर, मूग, उडीद, इतर कडधान्यांचे एकूण २१,०८,९०० हेक्टर सरासरी क्षेत्र होते. प्रत्यक्षात २३,३५,६०० हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच १११ टक्के पेरणी झाली आहे. पुणे २९५ टक्के, औरंगाबाद १४८, कोल्हापूर १२२, अमरावती १०६, लातूर व नागपूर ९१, नाशिक ९४, तर कोकण विभागात केवळ ५ टक्के कडधान्याची पेरणी झाली आहे. कापूस लागवडीत नागपूर सर्वाधिक १४५ टक्के असून औरंगाबाद ९१, पुणे ८९, नाशिक ८६, अमरावती ८०, लातूर ६६ टक्के आहे. कोल्हापूर विभागात अवघे तीन टक्के क्षेत्रावरच कपाशीची लागवड झाली.
पुढील वर्षी स्वयंपूर्ण होणार
सततच्या दुष्काळाने अन्नधान्य, गळीत धान्याच्या उत्पादन सतत घट होत गेली. त्यामध्ये सुधारणा होण्यासाठी या वर्षी आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष साजरे करत आहोत. तसेच आधारभूत किमतीत भरीव वाढ केली आहे. त्यामुळे उत्पादनात भरघोस वाढ अपेक्षित आहे. पुढील वर्षी आपण स्वयंपूर्ण होऊ असे वाटते.
डॉ. अशोक ढवण, कृषी शास्त्रज्ञ, कृषी विद्यापीठ, परभणी
दहा टक्के उत्पादन वाढ
सध्या सर्व पिकांची स्थिती बऱ्यापैकी चांगली आहे. उर्वरित मान्सून चांगला बरसणे आवश्यक आहे. तसेच वातावरण पोषक राहिल्यास उत्पादनात गतवर्षीपेक्षा दुपटीने, तर सरासरीपेक्षा ५ ते १० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
सतीश शिरडकर, कृषितज्ज्ञ, औरंगाबाद
बातम्या आणखी आहेत...