आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद जिल्ह्यातील ९४ गावे १०० टक्के जलयुक्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘जलयुक्त शिवार’साठी निवडलेल्या जिल्ह्यातील २२८ पैकी ९४ गावांतील कामे १०० टक्के पूर्ण झाली आहेत. मात्र, दोन वर्षांपासून कामे सुरू असूनही अन्य गावांतील कामे प्रगतिपथावरच असून आता या गावांसह नव्याने निवडलेल्या २२३ गावांतील कामे पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. पावसाळ्यानंतर निधी प्राप्त होताच उर्वरित गावातील कामे पूर्ण केली जातील, असे जिल्हा कृषी अधीक्षक एस.जी.पडवळ यांनी सांगितले. डिसेंबर २०१४ रोजी शासनाने जलयुक्त शिवार योजनेचा अध्यादेश काढला होता. मात्र, कामांची गती संथ असल्यामुळे “ही कामे पिढ्यानपिढ्या चालवायची आहेत का’ असा सवाल विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यानी अधिकाऱ्यांना केला होता. मार्च २०१६ अखेर जिल्ह्यातील कामे पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतरही जिल्ह्याचे उद्दिष्ट अपूर्णच राहिले.
जिल्ह्यातील २२८ गावात ५९५८ कामांचे नियोजन होते. त्यापैकी ४४९० कामे पूर्ण तर १४६८ कामे प्रगतिपथावर आहेत. योजनेअंतर्गत केलेल्या कामांवर ७२.४६ कोटी खर्च करण्यात आले आहेत. जिल्ह्यात २९५ सिमेंट नालाबांध बांधण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी २४६ पूर्ण तर ४९ कामे अपूर्ण आहेत. या कामांवर सर्वाधिक ३० कोटींचा खर्च करण्यात आला आहे. २५ हजार ६३४ हेक्टरच्या कंपार्टमेंट बंडिंगवर १२ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. सलग समतल चराची ३१५ पैकी २८३ कामे पूर्ण झाली असून त्यावर ६.६३ कोटी तर २९१ माती नालाबांधापैकी २४५ पूर्ण झाले असून त्यावर ४.८४ कोटी खर्च झाले आहेत. विहीर पुनर्भरणाची १४७३ पैकी ५२७ कामे पूर्ण तर ९४६ अपूर्ण आहेत. आतापर्यंत या कामावर ९१ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर गाळ काढण्याची ११८ पैकी ७८ कामे पूर्ण झाली आहेत.

पावसाळ्यानंतर उर्वरित कामे करणार
^पूर्ण झालेल्या कामांचा जुलैत आढावा घेतला जाईल. ९४ गावे १०० टक्के पूर्ण झाली असून ८० टक्क्यांपेक्षा जास्त कामे झालेल्या ५४ गावांतील आढावा घेतला जाईल. निधीच्या कमतरतेच्या अडचणी लोकसहभाग, सीएसआर तसेच इतर विभागांच्या निधीमुळे दूर होणार असून या माध्यमातून उर्वरित कामे पूर्ण करून २२३ गावांचे नियोजनदेखील करण्यात येईल. -एस. जी. पडवळ, जिल्हा कृषी अधीक्षक

तालुका १०० % ८० % एकूण
औ.बाद०८ १२ २९
पैठण १२ ०४ २६
फुलंब्री ११ ०३ २६
वैजापूर ०८ १५ ३१
गंगापूर २१ ०० २६
खु.बाद ०३ २०
सिल्लोड १० ०८ २८
कन्नड १५ ०१ २४
सोयगाव ०४ ०८ १८
एकूण ९४ ५४ २२८
बातम्या आणखी आहेत...