आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयटी-सातारा गाव रस्ता कामासाठी ९६ लाखांचे टेंडर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा वॉर्डाचा समावेश महानगरपालिकेत झाल्यापासून सहा महिन्यांत एकही काम मनपाने केले नाही. पहिल्याच कामाला आता मुहूर्त सापडला असून एमआयटी ते सातारा गाव व्हाइट टाॅपिंगचा रस्ता लवकरच होणार आहे. त्यासाठी ९६.८० लाख रुपयांचे टेंडर काढण्यात आले असून ठेकेदाराला दोन टक्के रक्कम भरण्यासाठी आठ दिवसांपूर्वीच पत्र देण्यात आले आहे. ही रक्कम भरताच कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे.
सातारा गावाचे कुलदैवत असलेल्या खंडोबाची यात्रा अवघ्या तीन महिन्यांवर आली असून त्यासाठी गावकऱ्यांकडून गावात सुविधा देण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यानुसार महानगरपालिकेच्या वतीने सातारा गाव ते एमआयटीपर्यंतच्या रस्त्याचे काम करण्यासाठी टेंडर काढले होते. त्यानुसार आदिनाथ कन्स्ट्रक्शनला हे काम देण्यात आले आहे. १९ सप्टेंबर रोजी या ठेकेदाराला वर्कऑर्डर देण्यापूर्वी दोन टक्के रक्कम भरण्याचे आदेश मनपाने दिले असून तसे पत्रही या ठेकेदाराला मनपाच्या वॉर्ड अभियंत्यांनी दिले आहे. पत्र दिल्यानंतर आठ दिवसांत ठेकेदाराने अद्यापपर्यंत ही दोन टक्के रक्कम भरली नाही. त्यामुळे वर्कऑर्डर देण्यात आली नाही. दोन टक्क्यांप्रमाणे दाेन लाख रुपये मनपाकडे भरण्यात येताच लगेच कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे. कामाची लांबी जास्त असल्याने साधारणत: सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता मनपाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. मात्र रस्त्याचे काम सुरू राहिल्याने गावकऱ्यांसह लाखो भाविकांंना त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे काम जलद गतीने करण्याची मागणी होत आहे.

९६.८० - लाखरुपये खर्च होणार आहे.
४.५ - मीटररस्त्याची रुंदी आहे.
- १३०० मीटरलांबीचा हा रस्ता एमआयटी ते सातारा गावापर्यंत असणार आहे
ठेकेदाराने दोन टक्के रक्कम भरल्याबरोबर वर्कऑर्डर देण्यात येईल. त्यानंतर तीन ते चार दिवसांत काम सुरू होण्याची शक्यता अाहे. एमआयटी ते सातारा गावापर्यंत १३०० मीटर लांबीचा हा रस्ता असणार आहे. त्याची रुंदी साडेचार मीटर राहणार आहे. त्यासाठी ९६.८० लाख रुपयांचा खर्च होणार आहे. काम करण्याचा अवधी अजून निश्चित करण्यात आला नाही. मात्र सहा महिने वेळ लागू शकतो.

या रस्त्यावर दोन पूल असून एक मोठा तर एक छोटा आहे. एमआयटीच्या बाजूला असलेला पूल ढासळलेला आहे. त्यामुळे हा पूल दुुरुस्त करूनच या रस्त्याचे काम करता येणार आहे. तसेच सिमेंट रस्ता १० वर्षांपर्यंत राहणार असल्याने मोठे पाइप टाकून पूल तयार करावा लागणार आहे. गावाजवळ नदी असून सध्या मोठ्या उतारात एक पूल उभारून त्यावर रस्ता बनवला आहे. वास्तविक जास्त पाणी आल्यावर यावरून जाणे धोक्याचे ठरते. त्यामुळे या पुलाची उंची वाढवावी लागणार आहे. रस्त्याच्या कामात या दोन्ही पुलांचा समावेश नाही. त्यामुळे या पुलांचे काम करण्यासाठी नव्याने अंदाजपत्रक तयार करून टेंडर काढावे लागेल.

ग्राम पंचायतीचा निधी : हा निधी महापालिकेचा अथवा नगर परिषदेचा नसून ग्रामपंचायतीचा आहे. नगर परिषदेकडे त्या वेळी हा निधी वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर हा वॉर्ड मनपात समाविष्ट झाल्यानंतर नगर परिषदेने निधी मनपाकडे वर्ग केला आहे. यात महानगरपालिकेने केवळ टेंडर काढून काम करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र ग्रामस्थांना सुविधा देण्यासाठी महापौर त्र्यंबक तुपे यांनी पावले उचलली असल्याने या कामाला प्रारंभ होत आहे.

२% रकमेसाठी पाठपुरावा
^ठेकेदाराने दोनटक्क्यांप्रमाणे दोन लाख रुपये भरण्याची मुदत संपली आहे. ही रक्कम भरण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच पुलाचे काम करण्यासाठी वेगळे अंदाजपत्रक तयार करावे लागेल. पी.जी. पवार, वॉर्ड अभियंता

यात्रेपूर्वी काम करावे
^रस्त्याचे काम हाती घेण्याचा मनपाचा निर्णय योग्य आहे. मात्र, यात्रा तीन महिन्यांवर अाली असून दोन महिने अथवा यात्रेपूर्वी रस्ता होण्यासाठी प्रयत्न करावे. त्यामुळे भाविकांना त्रास होणार नाही. रमेशबहुले, ग्रामस्थ, सातारा

काम सुरू करण्यापूर्वी मूळ ठेकेदाराने उपठेकेदाराला काम हस्तांतरित केल्याची चर्चा असून त्यामुळेच दोन टक्के रक्कम भरण्यास विलंब होत असल्याचे समजते. खरेच असा प्रकार झाला असेल तर मनपाने काय करायला हवे, याचा शोध मनपाचे अधिकारी घेत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...