आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - शहर पोलिसांनी दोन दिवसात देशीदारूच्या पाच अड्ड्यांवर छापे टाकले. नागरिकांच्या तक्रारीनंतर केलेल्या या कारवाईत विविध पोलिस ठाण्याचे २५ पेक्षा अधिक कर्मवारी सहभागी झाले. ठिकठिकाणी छापे मारूनही या कारवाईदरम्यान केवळ चार हजार ३६ रुपयांच्या देशी दारूच्या ७८ बाटल्या जप्त करण्यात आल्या.
हर्सूलमध्ये एकावर कारवाई : हर्सूल परिसरातील जहांगिर कॉलनीत बेकायदेशीररित्या देशी दारूची विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मधुकर काळे (६२, रा. जहांगीर कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्यांच्या जवळून १ हजार ४० रुपयांचा ऐवज जप्त केला. पोलिस शिपाई संतोष सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून काळेविरूद्ध हर्सूल ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहा. फौजदार सौन्ने करीत आहेत.
मुकुंदवाडीत तरुणाला पकडले : मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरात अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या तरुणावर पुंडलिकनगर पोलिसांनी कारवाई केली. २० मार्च रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. किशोर तुळशीराम डकले (२२, रा. विश्रांतीनगर) मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाजवळ देशीदारूची विक्री करत होता. पोलिसांनी त्याच्याकडून एक हजार ९२ रूपये किमतीची दारू जप्त केली. पोलिस शिपाई रवी जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक बी.जी चौरे करीत आहेत. अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची माहिती नागरिकांनी पुंडलिकनगर पोलिसांना दिली होती. त्याची दखल घेत पोलिस निरीक्षक लक्ष्मीनारायण शिनगारे यांच्या पथकाने कारवाई केली.
साताऱ्यातही कारवाई
पोलिसांनी साताऱ्यातून देशी दारूच्या १० बाटल्या जप्त करत महिलेविरोधात गुन्हा दाखल केला. ती घरासमोरच दारूविक्री करत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी छापा टाकताच मुद्देमाल सोडून तिने पळ काढला. तपास हवालदार काकडे करीत आहेत.
वाळूज परिसरात २ ठिकाणी छापे
१९ मार्च रोजी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी दोन ठिकाणी छापा मारत देशी दारूचा साठा जप्त केला. या प्रकरणात संतोष शहरादेव पवार (२३, रा. वडगाव कोल्हाटी) आणि जोगेश्वरी फाट्याजवळ महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष कडून ७८० रुपये तर महिलेकडून ६२४ रुपयांच्या दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.