आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंगलीला महिना; बंदोबस्त कायम, अटकसत्र थांबले; पंचनामा करून महिना झाला तरी मदत मिळेना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जुन्या शहरात झालेल्या दंगलीला महिना उलटला. जळालेली दुकाने नव्याने उभारण्यात आली. जनजीवन पुन्हा सुरळीत झाले. मात्र, राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्यांचा बंदोबस्त कायम आहे. लोकांच्या मनात धुसफूस आणि भीती आहे. पोलिसांचा तपास थंडावला असला तरी तो अजून थांबलेला नाही. शहरात सध्या सणाचे वातावरण असल्याने पोलिसांकडून अटकसत्र थांबवण्यात आले आहे. 


११ मे रोजी शहरात उसळलेल्या दंगलीत दोघांचा बळी गेला. पोलिसांनी तत्काळ ठोस भूमिका न घेतल्यामुळे ही दंगल वाढत गेल्याचे राजकारण्यांचे म्हणणे आहे. या दंगलीत सुमारे १०० वाहने, ६० दुकाने जाळण्यात आली. घरे, गाड्यांची तोडफोड करून नुकसान करण्यात आले. यात दहा ते बारा कोटी रुपयांचे नुकसान झाले. अडीच हजार लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. दंगलीचा तपास करण्यासाठी तत्कालीन पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी एसआयटी स्थापन केली. त्यामुळे तपासाला वेग आला होता. चार दिवसांत ६० जणांना अटक करण्यात आली होती. यात शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ, एमआयएमचा फिरोज खान तसेच लच्छू पहिलवान यांचा समावेश आहे. संशयितांना सोडा म्हणून क्रांती चौक पोलिस ठाण्यात राडा करणाऱ्या माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यावरही गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. जैस्वाल यांना तत्काळ जामीन मिळाला, तर जंजाळला एक महिना हर्सूल कारागृहात राहावे लागले. इतर संशयित अजूनही हर्सूल कारागृहातच आहेत. 


विमा काढण्यास कंपन्यांकडून नकार
नवाबपुऱ्याजवळ विनोद धोका यांचे प्रतीक टायर्स हे दुकान आहे. ११ मे रोजी समाजकंटकांनी दुकान जाळले. १४ ते १५ लाखांचा माल दुकानात होता. विविध राजकीय पक्षांनी मदत केली, मात्र ती दुकान उभारण्यास पुरेशी नव्हती. महिना झाला तरी शासनाकडून मदत मिळाली नाही. म्हणून घरातील सर्व सोने मोडले, मुलीच्या लग्नासाठी जमा केलेले पैसे खर्च करून दुकान सुरू केले. पुन्हा असा काही प्रकार झाला तर किमान विमा तरी असावा म्हणून बजाज अलायन्स कंपनीचा फॉर्म आणला. त्यांच्या प्रतिनिधीने दुकानाची पाहणी केली आणि थेट विमा काढण्यास नकार दिला. दंगलीचा भाग म्हणून या भागाची ओळख झाली आहे. त्यामुळे आमच्या दुकानांचा विमा काढण्यासदेखील कंपन्या तयार नसल्याचे धोका म्हणाले. 


सामान खरेदी करण्याची परिस्थितीच नाही
मोहंमद शाकेर अब्दुल रहीम हिंगोरा यांचे एमएमएस कॉम्प्युटर नावाचे दुकान आहे. दुकानातील सर्व साहित्य दंगलखोरांनी लुटले. दुकानाची तोडफोड केली. दुकान स्वत:चे आहे. ते विकण्याचा विचार होता. आजूबाजूच्यांनी धीर दिला म्हणून तो विचार मनातून काढून टाकला. मात्र, आता नवीन माल भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत, असे शाकेर म्हणाले. महसूल विभागाने पंचनामा करून महिना उलटला तरी मदत मिळाली नाही. 


काय आहे सध्याची परिस्थिती
पोलिसांनी तयार केलेली एसआयटी (विशेष तपास पथक) बरखास्त करण्यात आली आहे. सिटी चौक, क्रांती चौक, जिन्सी या पोलिस ठाण्याच्या अंतर्गत तपास सुरू आहे. त्यामुळे तपास पूर्णपणे थंडावला आहे. नव्याने आलेले पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी या ठिकाणाची भेट घेऊन काहीही वाटल्यास मला भेटा, असे आश्वासन दिले आहे. सिटी चौक पोलिस ठाण्याचा पदभार पुन्हा एकदा दादाराव शिनगारे यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यांनी या भागात बैठका घेऊन शांतता राखण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मात्र, अजूनही ज्या हातगाड्यांमुळे हा वाद सुरू झाला त्या तशाच रस्त्यावर उभ्या आहेत. जळालेल्या ६० दुकानांपैकी ४० पेक्षा अधिक दुकाने नव्याने सुरू झाली आहेत. दुकानदाराला प्रत्येक गोष्ट नव्याने घ्यावी लागली. मोठे व्यापारी व दुकानदार मात्र अजूनही स्थिर झालेले नाहीत. राजकीय पक्षांनी थोडी अार्थिक मदत केली, मोर्चे काढले, मात्र लोकांच्या मनातील भीती अजूनही कायम आहे. 

बातम्या आणखी आहेत...