आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धगधगते औरंगाबाद: 3 महिन्यांत 4 घटनांनी शहरात अशांततेचे वातावरण, सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबादमधील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याचा दुग्धाभिषेक करण्यात आला. - Divya Marathi
औरंगाबादमधील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याचा दुग्धाभिषेक करण्यात आला.

औरंगाबाद - त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्ष बहुमताने विजयी झाल्यानंतर 24 तासांत लेनिनचे दोन पुतळे पाडण्यात आले. त्यापाठोपाठ तामिळनाडूत रामास्वामी पेरियार यांच्या पुतळ्याची नासधूस झाली. हे लोण आता महाराष्ट्रात आणि संवेदनशील औरंगाबादपर्यंत येऊन पोहोचले आहे. शुक्रवारी रात्री शहरातील समर्थनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला डांबर फासण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे पोलिस उपायुक्त कार्यालयाच्या नाकासमोर हा प्रकार घडला आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये शहरात अशांतता निर्माण करण्याचे तीन प्रकरणे घडली आहेत. याशिवाय कचरा प्रश्नावरुन औरंगाबादमधील चारही दिशा धुमसत आहेत.

 

तीन महिन्यात शहर अशांत करण्याच्या चार घटना 

 

#1 - 10 मार्च 2018 - सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना 
- त्रिपुरातील डाव्यांची सत्ता उलथवून लावून भाजप सत्तेत आल्यानंतर 48 तासांत रशियन क्रांतिकारक ब्लादिमीर लेनिनचे दोन पुतळे पाडण्यात आले. या घटनेपासून पुतळ्यांचे राजकारण सुरु झाले आहे. 
- यानंतर तामिळनाडूमधील भाजपच्या दोन नेत्यांनी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केली होती. त्यानंतर तामिळनाडूच्या वेल्लोर जिल्ह्यात 6 मार्चच्या रात्री समाजसुधारक व द्रविड आंदोलनाचे संस्थापक ई. व्ही. रामासामी पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोड झाली. कोइम्बतूरमध्ये भाजप कार्यालयावर बाँबने हल्ला झाला. 
- या घटनांनंतर औरंगाबादमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला काळे फासण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेने औरंगाबाद शहर पुन्हा एकदा अशांत करण्याचा प्रकार झाला आहे, गेल्या 3 महिन्यात शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची ही चौथी घटना आहे. 

- सावरकर चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. हे कॅमेरे बंद असल्याची माहिती आता समोर आली आहे.

 

#2 - 22 फेब्रुवारी 2018 
- औरंगाबाद हे संवेदनशील शहर मानले जाते. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी शहरात महापुरुषांचे पोस्टर फाडल्यावरुन तणाव निर्माण झाला होता. 
- 22 फेब्रुवारीला शहरातील पुंडलिकनगर भागातील विजयनगर चौकात महापुरुषाचे बॅनर काही युवकांनी फाडल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. 
- पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तीन जणांना अटक केली होती, त्यामुळे हे प्रकरण लागलीच अटोक्यात आले होते. 
- 22 फेब्रुवारीच्या रात्री जयभवानीनगर, कॅनॉट प्लेस, टीव्ही सेंटर, मुकुंदवाडी, रामनगर, जटवाडा रोड या भागात रात्री उशिरापर्यंत तणाव आणि पोलिसांचा बंदोबस्त कायम होता.

 

#3- 2-3 जानेवारी 2018 
- 1 जानेवारी रोजी पुण्यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद सर्वप्रथम औरंगाबादमध्ये उमटले होते. 
- भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमलेल्या दलित-बहुजन समाजावर दगडफेक झाली होती. त्यानंतर औरंगाबादमध्ये बंद पाळण्यात आला. 
- प्रकाश आंबेडकर यांनी 3 जानेवारीला बंदचे आवाहन केले होते. या बंदला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले होते. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केल्याचा आरोप झाला होता. 

 

#4 - कचरा प्रश्न पेटलेला 
- औरंगाबाद शहरातील कचरा प्रश्न सध्या राज्यात गाजत आहे. विधानसभेतही औरंगाबदच्या कचऱ्याचे पडसाद उमटले आहेत. आज (10 मार्च) शहराची कचराकुंडी होण्याचा 22वा दिवस आहे. 
- नारेगाव येथील नागरिकांनी कचरा टाकण्यास विरोध केल्यानंतर 22 दिवसांपासून औरंगाबादकर कचऱ्यांच्या दुर्गंधीमध्ये आहेत. 
- नारेगावमध्ये नागरिकांनी कचरा टाकण्यास विरोध केल्यानंतर येथे पोलिस बळाचा वापर झाला होता. नारेगाव पाठोपाठ मिटमिटा येथेही नागरिकांनी विरोध केला. कचऱ्याच्या गाड्या जाळण्यात आल्या. पोलिसांनी मारहाण केल्याचाही आरोप झाला आहे. 


पुतळा विटंबनेला राज्यकर्ते जबाबदार - खासदार खैरे
पुतळा विटंबनेच्या घटनांना राज्यकर्तेच जबाबदार असल्याचा टोला शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी लगावला आहे. औरंगाबादमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला काळे फासण्याचा प्रयत्न झाला. याचा शिवसेना तीव्र निषेध करते असे खासदार खैरे म्हणाले. या घटनांना राज्यकर्तेच जबाबदार आहेत. सत्तेत आल्यानंतर आधीच्या राज्यकर्त्यांनी उभारलेले महापुरुषांचे पुतळे पाडणे योग्य नाही, असे म्हणत खैरींनी भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. 

 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, 3 महिन्यात 4 घटनांनी शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न

बातम्या आणखी आहेत...