आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेळ्या-मेंढ्या वळू नका, उद्योजक बना; धनगर समाजातील मुला-मुलींनी जानकर यांचा सल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- धनगर समाजाच्या मुला-मुलींनी शेळ्या-मेंढ्या वळण्यापेक्षा दूध, लोकर, पशुखाद्य विक्री यांसह विविध व्यवसायात उतरून उद्योजक बनावे, अंबानींशी स्पर्धा करण्याची उर्मी अंगी बाळगावी. उच्च शिक्षण घेऊन आयएएस, एमपीएससीतून क्लास वन अधिकारी होण्याचे ध्येय निश्चित करावे, असे आवाहन रासपचे माजी अध्यक्ष तथा पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी केले. 


अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मंत्री जानकर, अर्जुन खोतकर, आयुक्त कांतीलाल उपमा आदींच्या हस्ते १९ लाभार्थी शेतकऱ्यांना प्रत्येकी २० मेंढी व एक एडका वाटप करण्यात आले. त्यानंतर शनिवारी पडेगाव येथील कार्यालयात राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा शुभारंभ आणि शेळ्या-मेंढ्यांचे खाद्य बनवण्याचे फिड मिलचे उद्््घाटन करण्यात आले. या वेळी जानकर म्हणाले की, देशात प्रथमच धनगर समाजाच्या कल्याणासाठी महामेष योजना राबवली जात असून यासाठी ४५ कोटी ९१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत मिळेल. मात्र, पारंपरिक मेंढी पालनाबरोबर विविध जातीच्या मेंढ्यांचे पालन करणे, दुग्ध, लोकर विक्री व्यवसाय वाढवणे यासह कौशल्यानुसार व्यवसायाची निवड करून धनगरांच्या मुला-मुलींनी उद्योजक होण्यासाठी पुढाकार घ्यावा, सरकार त्यांच्यासोबत आहे, अशी ग्वाही जानकर यांनी दिली. मेंढपाळांच्या मुलांना शिक्षणाच्या सोयी सवलतीबाबत लवकरच धोरण जाहीर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


आरक्षणासाठी सकारात्मक
सत्ता मिळवण्यासाठी मतावर डोळा ठेऊन घाईघाईत मराठा आरक्षण जाहीर केले. मात्र ते न्यायालयीन प्रक्रियेत अडकले आहे. असे धनगर समाजाच्या आरक्षणाचे होऊ नये, यासाठी सरकार काम करत आहे. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ११० टक्के आरक्षणास समर्थन आहे. आम्हाला घाई करायची नाही. मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचादेखील तिढा सोडवला जाणार आहे. पडेगाव कार्यालयाच्या क्षेत्रात अहिल्यादेवी होळकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, अशी मागणी काही कार्यकर्त्यांनी केली असता, ते तर काम केले जाईल, मात्र, त्याऐवजी थोर महापुरुषांचे कर्तृत्व, शिकवण अंगीकारण्यास सांगितले. 


आर्थिक मदतीसाठी महामंडळ 
धनगर समाजाच्या मुला-मुलींनी उद्योग व्यवसायात यावे, यासाठी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर महामंडळ किंवा दुसऱ्या एखाद्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यासाठी तरतूद केली जाणार असल्याचेही जानकर म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...