आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीचा निकाल: प्रत्येक वर्षी विभागात प्रथम येणारा बीड जिल्हा यंदा तिसऱ्या स्थानी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - बारावीच्या निकालात प्रत्येक वर्षी औरंगाबाद विभागात बाजी मारणाऱ्या बीड जिल्ह्याची यंदा पीछेहाट झाली असून विभागात परभणी जिल्हा पहिला आला आहे. परभणी जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक म्हणजे ८९.९० टक्के लागला असून बीडचा निकाल ८९.०८ टक्के लागला आहे.  मराठवाड्यात बारावीच्या निकालात यंदा  बीड जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे.  


यंदा बारावीच्या परीक्षेत औरंगाबाद विभागाचा एकूण निकाल ८८.७४ टक्के इतका लागला आहे.  गेल्या पाच वर्षापासून औरंगाबाद विभागात बीड जिल्ह्याचा सर्वाधिक निकाल लागत असे  यंदा मात्र बीड जिल्हा बारावी परीक्षेच्या निकालात विभागात  तिसरा आला आहे. या जिल्ह्याचा निकाल  ८९.०८ लागला   असून यंदा  १.४१ टक्क्याने जिल्ह्याचा निकाल  घसरला आहे.

 

जिल्ह्यातील केवळ अडीचशे पैकी सहा महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल आहे. जिल्ह्यात यंदा बारावीच्या परीक्षेत    विज्ञान शाखेचा सर्वाधिक  निकाल लागला असून तो  ९५.६४ टक्के आहे. त्या खालोखाल   वाणिज्य शाखेचा  निकाल ८८.५१ टक्के  लागला असून व्यवसाय अभ्यासक्रमाचा ८२.३२  टक्के लागला असून यात सर्वात कला शाखेचा  निकाल कमी लागला असून हे प्रमाण ८०.५९ टक्के  एवढे आहे. औरंगाबाद विभागात परभणी जिल्ह्याचा सर्वाधिक म्हणजे  ८९.९० टक्के इतका निकाल लागला असून त्या खालोखाल औरंगाबाद जिल्ह्याचा ८९.१५ टक्के, तर विभागातील जालना जिल्ह्याचा ८७.४५ टक्के व हिंगोली जिल्ह्याचा ८६.४० टक्के इतका निकाल लागला आहे.

 

उस्मानाबाद - कॉपीमुक्ती अभियानाचा दणका, निकाल एक टक्क्याने घसरला

कॉपीमुक्ती अभियानाच्या दणक्यामुळे जिल्ह्याचा १२ वीचा निकाल गतवर्षीपेक्षा एका टक्क्याने घसरला असून गतवर्षी ८४.३२ टक्के निकाल असताना यावर्षी ८३.६४ टक्के निकाल लागला आहे. अपेक्षेप्रमाणे मुलीचा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण १२ टक्क्यांनी अधिक आहे. यामध्ये रिपीटर्सची कामगिरी अत्यंत सुमार राहिली असून त्यांचा निकाल चार टक्क्यांनी घसरून २८.४४ टक्के लागला असून गतवर्षी ३२.५७ टक्के निकाल होता.

 

दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात कॉपीमुक्ती अभियान अत्यंत काटेकोरपणे राबवण्यात आले. जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, माध्यमिक शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांच्या मार्गदर्शनात राज्यात विक्रमी रस्टीकेटच्या केसेस करण्यात आल्या होत्या. यामध्ये ५२ विद्यार्थ्यांना रस्टीकेट करण्यात आले होते. यावेळी बारावीच्या निकालाची टक्केवारी घसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. अधिक नुकसान झाले नसले तरी गतवर्षीपेक्षा एक टक्क्याने निकालात घसरण झाली आहे.


जिल्ह्यात एकूण १६ हजार ३६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र, १६ हजार ३०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १३ हजार ६३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

 

हिंगोली :  ८८.७४ % निकाल;  यंदाही मुलींनीच मारली बाजी

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ८८.७४ एवढा टक्के लागला असून यात ७ हजार १७९ मुलांपैकी ६ हजार २ मुले तर   ४ हजार ९७३ पैकी ४ हजार ४९२ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८३.६० तर मुलींची टक्केवारी ९०.४३ एवढी आहे. त्यामुळे  यंदाही मुलां  पेक्षा मुलीच सरस असल्याचे आकडेवारी वरून दिसून येत आहे. हिंगोली जिल्ह्यात ३१ केंद्रावर बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला एकूण १२ हजार १९१ विद्यार्थ्यानी नोंदणी केली होती.  त्यापैकी १२ हजार १५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर १० हजार ४९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

 
विज्ञान शाखा 
एकूण ४ हजार ७१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४ हजार ६९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या विद्या शाखेतील २७३ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून प्रथम श्रेणीत २०३३ विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत २१९३ उत्तीर्ण झाले आहेत.  या शाखेचा निकाल ९५.२७ टक्के एवढा लागला आहे.


कला शाखा  
कला शाखेसाठी ६ हजार ३२९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६ हजार ३०७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून ४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात ४६६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यामध्ये आले आहेत. तर प्रथम श्रेणीत २ हजार ५२९, द्वितीय श्रेणीत १ हजार ९१९, तर ८० तृतीय श्रेणी मध्ये यशस्वी झाले आहेत.  या शाखेचा  निकाल ७९.१८ टक्के एवढा लागला .


वाणिज्य शाखा 
८३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८२८ परीक्षेला बसले होते. तर ७७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १४८ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले. प्रथम श्रेणीत ३९२ विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीमध्ये २२८ तर ७ जन केवळ उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेचा निकाल सर्वात जास्त म्हणजे ९३.६० टक्के लागला असून औरंगाबाद विभागात हिंगोली जिल्ह्याने वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

 

परभणी :  विज्ञानचा निकाल सर्वाधिक

बारावीच्या परीक्षेत यंदाही मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण सर्वाधिक राहिल्याने मुलींनी या परीक्षेत बाजी मारली आहे. जिल्ह्याचा निकाल ८९.९० टक्के लागला असून यात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९४.६७ टक्के इतका आहे.   कला शाखेचा ८४.३६ टक्के, वाणिज्य शाखेचा ९१.९३ टक्के, किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाचा ८४.५५ टक्के तर विज्ञानचा सर्वाधिक ९४.६७ टक्के निकाल लागला आहे.

 

या परीक्षेसाठी नऊ तालुक्यांतील २२ हजार ६६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा पत्रे भरली होती. प्रत्यक्षात २२ हजार ५८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातून २० हजार ३०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८७.७५ टक्के तर मुलींचे प्रमाण ९१.३४ टक्के आहे. 

 

नांदेड :  आदिवासी बहुल माहूर तालुका जिल्ह्यात अव्वल

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. जिल्ह्याची एकूण टक्केवारी पाहता यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. ८९.३४  टक्के निकाल लागला आहे. तर माहूर तालुका हा  जिल्ह्यात आघाडीवर आहे. आदिवासीबहुल माहूर तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९२.५४ टक्के एवढा लागला आहे. 


बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातून ३३हजार ६१३ विद्यार्थ्यांनी परीक्षा मंडळाकडे अर्ज केला होता. त्यापैकी १९ हजार ४०६ विद्यार्थी तर १४ हजार ११४ विद्यार्थिनी असे एकूण ३३ हजार ५२० विद्यार्थ्यांनी ७२ परीक्षा केंद्रावरून परीक्षा दिली होती.  त्यापैकी १६ हजार ८२४ विद्यार्थी तर १३ हजा र१२२ विद्यार्थिनी असे एकूण २९ हजार ९४६  विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण टक्केवारी पाहता ८९.३४ टक्के निकाल लागला आहे. त्यात ९२.९७ टक्के जिल्ह्यातील विद्यार्थिनी उत्तीर्ण होऊन दरवर्षीची परंपरा कायम ठेवली आहे तर ८६.६९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर विभागात नांदेड दुसऱ्या स्थानावर आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...