आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्रीमुळे भय्यूजींचे नव्वदपासून जुळले औरंगाबादशी संबंध, पुढे जावई झाले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भय्यू महाराज यांनी परदेशी यांच्या घरी भेट दिली होती. - Divya Marathi
भय्यू महाराज यांनी परदेशी यांच्या घरी भेट दिली होती.

औरंगाबाद- भय्यू महाराज ऊर्फ उदयसिंह देशमुख यांचे औरंगाबादशी जुने नाते आहे. १९९० च्या दशकात त्यांची येथील अखिल अब्बास यांच्याशी मैत्री झाली अन् ते औरंगाबादशी जोडले गेले. अखिल अब्बास यांच्या दुकानात ते तासन््तास गप्पा मारत. १९९५ मध्ये त्यांचे राजाराम निंबाळकर या निवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या मुलीशी लग्न झाले अन् ते औरंगाबादचे जावई झाले. २००० च्या सुमारास ते ज्युबिली पार्क येथे वास्तव्यास होते. जवळपास तीन वर्षे त्यांचा येथे आश्रम होता. या काळात शहरातील अनेक जण त्यांच्या संपर्कात आले. त्यात माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, समीर राजूरकर यांच्यासह राजकारणातील अनेक मंडळी त्यांच्या संपर्कात आली आणि शेवटपर्यंत त्यांचा संपर्क कायम राहिला. तेव्हा त्यांंना महाराज ही उपाधी मिळालेली नव्हती. आताही महिन्याला त्यांची औरंगाबादेत चक्कर असे. सूर्योदय संस्थेच्या वतीने गरीब विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप दरवर्षी करण्यात येत असे. त्यासाठी ते स्वत: येत असत. 


मित्र परिवारासह अनेक जण भय्यू महाराजांच्या आठवणींनी झाले व्याकुळ; औरंगाबादेतील वास्तव्यात अनेकांशी जडला स्नेह 
भय्यूजी महाराज यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्काच बसला. त्यांचे सामाजिक कार्य अतुलनीय होते. भय्यूजी महाराज हे माझ्या परिवाराचे मार्गदर्शक होते. शहराशी त्यांचे नाते अतूट होते. त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वादामुळे माझ्या राजकीय जीवनात प्रगती होत गेली. त्यांच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज होती. त्यांच्या अचानक जाण्याने अतीव दु:ख झाले. 
- नंदकुमार घोडेले, महापौर 


जे घडले त्यावर विश्वास बसत नाही. ते महाराज नव्हते तेव्हापासून आमची ओळख आहे. त्यांचा चुलत भाऊ नितीन देशमुख शहरात राहतो, तो माझा मित्र होता. नव्वदच्या काळात माझे व्हील अलाइनमेंटचे दुकान होते. तिथे नितीनसोबत ते आले होते. महिन्याभरापूर्वीच इंदूरला गेलो तेव्हा आम्ही मनसोक्त गप्पा मारल्या. 
- अखिल अब्बास, सचिव, पेट्रोल डीलर्स असोसिएशन 


१९९५ पासून मी त्यांच्या संपर्कात होतो. अंधश्रद्धेवर त्यांचा विश्वास नव्हता. नवी पिढी घडवण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांचे या पद्धतीने जाणे धक्कादायक असेच आहे. 
- समीर राजूरकर, माजी नगरसेवक 


भय्यू महाराजांनी स्वत:वर गोळी झाडून घेतल्याचे समजताच मला धक्का बसला. हे सर्वांनाच अनपेक्षित होते. ते काही जादूटोणा करणारे महाराज नव्हते. ते एक समाज परिवर्तक होते. त्यांनी गोरगरिबांना मदत केली. या वर्षी गरीब मुलांना पुस्तके वाटप करण्यासाठी ते येणार होते. परंतु त्याआधीच ते आपल्याला सोडून गेले. यामुळे समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. 
- प्रदीप जैस्वाल, माजी आमदार 


गेल्या अनेक वर्षांपासून मी त्यांच्या संपर्कात आहे. त्यांच्या सान्निध्यात एक प्रकारचे समाधान असे. गुरुपाैर्णिमेला त्यांच्याशी थेट भेट झाली. त्यानंतर दोन वेळा फोनवर बोलणे झाले. 
- राजेंद्र शहापूरकर, पत्रकार 


या बातमीने मला अनपेक्षित धक्का बसला. दोन महिन्यांपूर्वीच त्यांची भेट झाली होती. काही दिवसांनी ते शहरात येणार होते. नेमके काय झाले हे समजू शकणार नाही, परंतु त्यांची समाजाला गरज होती. त्यांच्यामुळे गरिबांची अनेक मुले शिकू शकली. त्यांनी नव्या पिढीला मार्गदर्शन करताना सामाजिक आणि आध्या त्मिक कार्याकडे प्रेरित केले होते. 
- अंबादास दानवे, शिवसेना जिल्हाप्रमुख 


दहा ते बारा वर्षांपासून मी त्यांच्या संपर्कात होतो. काही कारणास्तव ते माझ्या मुलीच्या लग्नास येऊ शकले नाहीत. मात्र, त्यानंतर जेव्हा ते शहरात आले त्या वेळी ते आठवण ठेवून माझ्या घरी आले. कुटुंबीयांची आस्थेने चौकशी केली. आशीर्वाद दिले. हा प्रसंग माझ्यासाठी आयुष्यभर पुरणारा आहे. 
- दीपक परदेशी, विशेष शाखा, शहर पोलिस 


२ महिन्यांपूर्वी त्यांच्याशी शेवटची भेट झाली. त्यांनी समाजातील वंचित घटकांसाठी तसेच मराठा समाजासाठी केलेले काम मोलाचे आहे. त्यांचे अशा पद्धतीने जाणे मनाला चटका लावून गेले. 
- धो. का. पवार, अ. भा. वारकरी संघटना 

बातम्या आणखी आहेत...