आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उर्ध्व गोदावरी कालव्यांच्या नोंदी सहा तासाला तपासणार; नगर- नाशिकच्या चाेरीला चाप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गोदावरीतील पाण्याचे समन्यायी वाटप होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशानुसार समिती नेमण्याचे आदेश गोदावरी महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी काढले आहेत. यापुढे उर्ध्व गोदावरी भागातील कालव्याची दर ६ तासाला तपासणी करण्यात येईल. त्यामुळे परस्पर पाणी वळवले तर त्याचा हिशेब तंतोतंत ठेवला जाणार आहे. शिवाय, समितीतील कोणताही सदस्य कोणाताही प्रकल्प, कालवा किंवा कार्यालयास भेट देऊ शकेल. तसेच यावर देखरेख करण्याचे अधिकारही समिती सदस्याला असतील.
गोदावरीवर असलेल्या वरील भागातील प्रकल्प व कालव्यांतून परस्पर पाणी वळवले जात असल्याच्या सततच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र जलंपत्ती नियमन प्राधिकरणाने ३० मे २०१८ रोजी समन्यायी पाणीवाटबाबत योग्य अंमलबजावणीसाठी समिती नेमण्याचे आदेश दिले. समितीमधील प्रत्येकाच्या जबाबदाऱ्याही निश्चित करण्यात आल्या आहेत.


समितीला पाणी तपासण्याचे सर्वाधिकार
राज्य जलसिंचन विभागाचे मुख्य लेखापरीक्षक समितीचे अध्यक्ष असतील. तर “कडा’च्या नाशिक, नगर  आणि औरंगाबाद विभागाचे अधीक्षक अभियंता समितीचे सचिव असतील. राज्य जल व सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता मुख्य, लेखा परीक्षक सदस्य सचिव असतील. ही समिती विशेषत्वाने उपखोऱ्यातील विविध प्रकल्प, नद्या, कालवे यांतील खरीप हंगामासाठीच्या पाणीवापराची देखरेख करेल. उर्ध्व गोदावरी उपखोऱ्यात खरिप हंगामात होणारा दैनदिन पाणीवापर व १५ ऑक्टोबर रोजीचा पाणीसाठा या बाबीचा हिशेब ठेवून त्यावर सनियंत्रण करण्यासाठी समितीने विविध प्रपत्रे तयार करावीत व सर्व संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांना द्यावीत, असे आदेशात नमूद आहे.m

 

दोन्ही भागांतील अधिकारी एकत्रित तपासणी करणार 

औरंगाबादच्या अधिकाऱ्यांना पूर्वी जायकवाडीच्या वरील भागात पाणी तपासणीसाठी गेले तर कोणीही दाद देत नव्हते. आता १ जूलै ते १४अॉक्टोबरदरम्यान  कालव्यावर  समितीने नेमलेले दोन्ही भागातील अधिकारी एकत्रित तपासणी करणार आहेत. उर्ध्व भागातून धरण व  बंधारा  येथून निघालेल्या कालव्यातून होणाऱ्या पाणीवापराचा हिशेब ठेवण्यासाठी गेज व विसर्ग यांच्या नोंदी दिवसातून किमान सहा तासाला घेतल्या जातील. प्रकल्पनिहाय कालव्यातून होणाऱ्या दररोजच्या पाणीवापराच्या संयुक्त नोंदी नाशिक आणि औरंगाबाद प्राधिकरणाच्या दोन्ही अधिकारी-कर्मचारी यांनी ठेवाव्यात व त्यावर दोन्ही प्रदेशाच्या कर्मचाऱ्यांच्या सह्या असाव्यात, असेही निर्देश आहेत.

 

उर्ध्व धरणांच्या हिशेबाची जबाबदारी नाशिक विभागाची 

नगर आणि नाशिक विभागाने सिंचन, पिण्याचे पाणी,औद्योगिक वापर,बाष्पीभवन व्यय याच्या नोंदी दररोज ठेवाव्यात. तसेच धरण समूहाची एकत्र माहिती ८ दिवसांनी समितीला सादर करावी लागेल.  उर्ध्व गोदावरी खोऱ्यात माहिती संकलन करण्यासाठी अधिकारी-कर्मचारी नेमण्याचे आदेश. उर्ध्व भागातील धरण व नदीवरील होणाऱ्या पाणीवापराचा हिशेब ठेवण्याची जबाबदारी नाशिक विभागाची.  नाशिक विभागाने प्रकल्पनिहाय धरणातून व नदीतून सिंचनाचे, पिण्याचे पाणी व औद्योगिक पाणी  वापराच्या दररोजच्या नोंदी ठेवाव्यात. संबधितांच्या  स्वाक्षऱ्या असाव्यात. विशेष म्हणजे खरीप हंगामात कालव्यातून एकूण सोडलेल्या पाण्यातून पिण्यासाठी प्रत्यक्ष केलेला पाणीवापर वजा करून उर्वरित पाणी सिंचनासाठी वापरले, अशी नोंद करावी लागणार.


जायकवाडीला मिळेल हक्काचे पाणी

भर पावसाळ्यात नांदुरमधमेश्वर, ओझवेअर आणि पालखेड समूहातील कालव्यातून दररोज पाणी सोडले जात होते. पिण्यासाठी व खरिपासाठी सोडले जात असल्याने वास्तविक हिशेब १५ ऑक्टोबरच्या  पाणीसाठ्यात येत नसे. आता  दर सहा तासाला मराठवाड्यातील अधिकाऱ्यांकडून तपासणी होणार असल्यामुळे कालव्याचे वास्तव कळेल आणि त्याचा फायदा जायकवाडीला हक्काचे पाणी मिळण्यासाठी होईल.

 

या कालव्यांची तपासणी
नांदुर-मधमेश्वरचे तीनही कालवे तसेच प्रवरा नदीवरील ओझर, पालखेड धरण समुहातील दोन्ही, वाघाडचे दोन्ही कालवे करंजवण,ओझरखेडचा डावा कालवा, आणि तिसगाव उजवा याची खरिप हंगामातल्या नोंदी ठेवण्यात येणार आहेत. तसेच दारणा समूहातील वालदेवी  पुणेगाव, कडवा,  गंगापूर धरण समूहातील दोन्ही डावा-उजवा कालवा, तसेच आळंदी,आढळा, भोजापूर,मुळाचे दोन्ही कालवे व मांडओहोळचा उजवा कालवा याची तपासणी होणार आहे.

 

समिती नेमून  कार्यवाहीच्या सूचना दिल्या
गोदावरी पाटबंधारे महामंडळाने समिती नेमून त्यांच्या जबाबदारीबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कालव्याची दर सहा तासाला तपासणी केली जाईल. त्यासाठी अधिकारी नेमले जातील. समिती सदस्याला कोणताही प्रकल्प, कालवा किंवा कार्यालयास भेट देणे, माहिती मिळवण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत.
अजय कोहिरकर, कार्यकारी संचालक, गोदावरी पाटबंधारे महामंडळ

बातम्या आणखी आहेत...