आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात मार्चपर्यंत राहणार थंडी, मेमध्ये अवकाळी पाऊस शक्य; धुके, हिमवर्षाव वाढणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- समुद्राचे तापमान थंड ठेवणारा ला निना सक्रिय असल्याने देशातील थंडीचा मुक्काम वाढणार आहे. यंदा उत्तर भारतात पाच वर्षांतील सर्वात दीर्घकाळ राहिलेली थंडीची लाट अनुभवास येत आहे. मकर संक्रांतीनंतर थंडी कमी होण्यास सुरूवात होत असली तरी यंदा मात्र देशात मार्च पर्यंत थंडी राहील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. अमेरिकेच्या नॅशनल प्रेडिक्शन केंद्राच्या अहवालानुसार सध्या ला निना घटक सक्रिय असल्याने उत्तर गोलार्धात कडाक्याच्या थंडीचे प्रमाण जास्त राहील.


या संदर्भात कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले, देशात मुख्यत्वे उत्तर भारतात थंडीचे प्रमाण जास्त राहील. त्या तुलनेत महाराष्ट्रात आगामी काळात फारशी थंडी जाणवणार नाही. ला-निना जून पर्यंत सक्रिय राहील. त्यामुळे भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.


अमेरिकेच्या नॅशनल प्रेडिक्शन सेंटरच्या ताज्या अहवालानुसार जानेवारी ते मार्च या काळात ला - निना चांगलाच सक्रीय राहील. त्यामुळे प्रशांत महासागराचे तापमान थंड राहील. परिणामी जगभर कडाक्याच्या थंडीचे प्रमाण जास्त राहील.

 

थंडीचे दूरगामी परिणाम
औरंगाबाद येथील एमजीएम अंतराळ संशोधन केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले, यंदा मार्चपर्यंत उत्तर भारत, मध्य भारतात कडाक्याची थंडी राहील. त्यामुळे शेती, वाहतूक यावर मोठा परिणाम होईल. यंदा च्या हिवाळ्यात अातापर्यंत रेल्वे, विमाने रद्द होणे, उशीर होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन त्याचा सामाजिक, आर्थिक परिणाम जाणवतो आहे. आगामी काळात पीक पद्धतीत बदल करणे अनिवार्य आहे. हिमालयाच्या पायथ्याशी रुजलेली पीक पद्धती आता उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात रुजवावी लागणार आहे. मैदानी भागातील पीक पद्धती मध्य भारतात रुजवावी लागणार आहेत. अति तीव्र हिवाळा आणि अति तीव्र उन्हाळ्याचा अनुभव वारंवार येत आहे. त्यामुळे उत्तर भारतातून मानवी स्थलांतराचे प्रमाण वाढणार आहे.

 

आगामी काळातील स्थिती 

जाने. ते मार्च : उत्तर भारतात कडाक्याची थंडी, धुके, हिमवर्षाव
मार्च ते मे : समशीतोष्ण हवामान, अवकाळी पाऊस शक्य
मे ते जुलै : दक्षिण, मध्य भारतात चांगला पाऊस
जुलै ते सप्टेंबर : देशभरात चांगला पाऊस

> जानेवारी ते मार्च या काळात ला निना ८६% राहील, तर मार्च ते मेमध्ये 
४६% राहील. मे ते जुलैमध्ये २६% जुलै ते सप्टेंबर २२% राहील.

 

 महाराष्ट्राला जास्त धोका नाही
डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले, महाराष्ट्रात आता तापमान वाढीस लागणार आहे. उत्तर भारतातून काही प्रमाणात थंड वारे आल्यास काही प्रमाणात थंडी जाणवेल. कृषी तज्ज्ञ देवेंद्र शर्मा यांनी सांगितले फेब्रुवारीत जास्त थंडी राहिली तर गव्हात दाणा भरण्याचे प्रमाण कमी राहील.

बातम्या आणखी आहेत...