आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसऱ्या वर्षापासूनच केली क्रिकेटला सुरुवात, आता ठरलाय ‘रन मशीन’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मुंबईतील आझाद मैदान. तेथे एकाच वेळी १८-२० सामने होतात. सर्व खेळाडूंचे लक्ष आपापल्या सामन्यावर असते. पण येथे जेव्हा पृथ्वी शॉ फलंदाजी करतो तेव्हा इतर खेळाडूंसोबतच त्यांचे आई-वडील आणि प्रशिक्षकांचे लक्षही पृथ्वीच्या फलंदाजीकडेच असते. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी लोक दूरवरून येतात. तो मुंबईतील सर्वात लोकप्रिय युवा क्रिकेट खेळाडूंपैकी एक आहे. पृथ्वी शॉ न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे. आज भारताचा स्पर्धेतील पहिला सामना आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच तो क्रिकेट खेळत आहे. आता त्याला क्रिकेटचे ‘रन मशीन’ म्हणतात.  


सुमारे १० वर्षांपासून पृथ्वीचे प्रशिक्षक असलेले राजू पाठक यांनी सांगितले की, जेव्हा मी पृथ्वीला पहिल्यांदा चाचणीसाठी रिझवी स्प्रिंगफील्ड स्कूलमध्ये बोलावले तेव्हा एका लहान मुलात एवढी गुणवत्ता असू शकते यावर माझा विश्वासच बसला नाही. आम्ही मुलांच्या वयानुसार १० वेगवेगळे नेट लावतो. त्यातच मुले आपल्या समवयस्क मुलांसोबत सराव करतात. आम्ही जेव्हा पहिल्यांदा पृथ्वीची चाचणी घेतली तेव्हा तो ७-८ वर्षांचा होता. मला १२ वर्षांच्या मुलांसोबत सराव करू द्या, असे तो म्हणत होता. आम्ही त्याला नकार दिला आणि त्याच्या वयाच्या मुलांसोबतच सराव सुरू केला, पण ८-१० चेंडूंनंतरच आम्ही त्याला मोठ्या मुलांच्या नेटमध्ये शिफ्ट केले.

  
पृथ्वी तीन वर्षांचा होता तेव्हाच त्याचे वडील पंकज शॉ यांनी संतोष टिंगुलकर यांच्या क्रिकेट अकादमीत प्रवेश मिळवून दिला. सध्या तो रिझवी स्प्रिंगफील्ड स्कूलमध्ये १२ वीत आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन हा पृथ्वीचा चांगला मित्र आहे. स्वत: सचिन तेंडुलकरलाही पृथ्वीची फलंदाजी आवडते.  लहानपणापासूनच पृथ्वीला बटाट्याची भजी खूप आवडतात. एखाद्या खेळाडूने मागितले तरी तो देत नसे. अगदी प्रशिक्षकांनाही नाही.  


पृथ्वीला चायनीज फूड खूप आवडते. चांगली फलंदाजी केली की तो प्रशिक्षकांकडे सूपची मागणी करत असे. पृथ्वीचे संपूर्ण जीवन अत्यंत संघर्षपूर्ण आहे. त्याच्या वडिलांचा कपड्यांचा छोटासा व्यवसाय होता. पृथ्वी ४ वर्षांचा होता तेव्हाच त्याच्या आईचे निधन झाले होते. पृथ्वीने जेव्हा अकादमीत प्रवेश घेतला होता तेव्हा त्याला रोज पहाटे ४ वाजता उठून मैदानावर जावे लागायचे. एवढ्या लहान वयात सुमारे साडेतीन तास प्रवास करावा लागायचा. सकाळी त्याची तयारी करण्यापासून ते नाष्टा बनवण्यापर्यंतचे काम त्याचे वडील पंकज हेच करत असत. नंतर त्यांना आपला व्यवसाय बंद करून अकादमीजवळ शिफ्ट व्हावे लागले.  


पृथ्वीसोबत खेळणारा क्रिकेटपटू अंचल मिश्रा म्हणाला की, पृथ्वीने आतापर्यंत वेगवेगळ्या ६ संघांचे कर्णधारपद भूषवले आहे, पण संघातील कुठलाही खेळाडू त्याच्या दबावाखाली नसतो हे त्याचे वैशिष्ट्य. त्याचे तंत्र खूप चांगले आहे. राजू पाठक यांनी सांगितले की, माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू इक्बाल सिद्दिकीने पृथ्वीला नेटमध्ये सराव करताना पाहिले होते. 


तेव्हा त्याने पृथ्वीला विचारले होते की, तुझी उंची विकेटएवढीच आहे, मग तू स्टम्पचा चेंडू का मारतोस? तेव्हा पृथ्वी एवढा लहान होता की त्याच्या हेल्मेटला चेंडू लागला असता तरी ते एलबीडब्ल्यू होण्याची शक्यता होती. क्रिकेटबद्दल त्याचे वेड खूप मोठे होते. २०११ मध्ये हॅरिस शील्ड या प्रतिष्ठित स्पर्धेत रिझवी स्प्रिंगफील्डचा सामना अंजुमन इस्लामच्या संघाशी होता. पृथ्वीच्या संघाचे महत्त्वाचे खेळाडू चाचणीसाठी गेले होते. तेव्हा संघाला चांगल्या खेळाडूंची गरज होती. पृथ्वीला तेव्हा ताप होता. पण प्रशिक्षकाने त्याला हे सांगितल्यानंतर तो औषध घेऊन मैदानावर खेळण्यासाठी आला. त्याने त्या सामन्यात शानदार १६६ धावा केल्या. राजू म्हणाले की, मोठमोठ्या खेळाडूंना कुठलाही एखादा शॉट खेळण्यासाठी किंवा चूक सुधारण्यासाठी १०० चेंडू खेळावे लागतात तेथे पृथ्वी १०-२० चेंडूंतच आपली चूक दुरुस्त करतो. त्याच्यात नैसर्गिक गुणवत्ता आहे. पृथ्वीने आतापर्यंत प्रथम श्रेणीच्या ९ सामन्यांत ५६.६२ च्या सरासरीने ९६१ 
धावा काढल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...