आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय विश्रामगृह परिसरात कुत्र्यांच्या बंदाेबस्ताची धावपळ; सरकारी यंत्रणेचे 'मिशन श्वान'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहरात माेकाट कुत्र्यांनी सामान्य नागरिकांना सळाे की पळाे करून साेडत दाेन दिवसांत ५४ जणांना चावा घेतला असताना अाणि त्यापेक्षाही भीतिदायक बाब म्हणजे एका दीड वर्षाच्या मुलाला कुत्र्याने भक्ष्यच केले असताना त्याकडे सपशेल दुर्लक्ष करणाऱ्या सरकारी यंत्रणेने बुधवारी (दि. १४) शासकीय विश्रामगृह परिसरात कुत्र्यांचा बंदाेबस्त करण्यासाठी चांगलीच धावपळ केली. 


शहरातील अन्य भागांप्रमाणे विश्रामगृह परिसरातही मोकाट कुत्र्यांचा माेठाच सुळसुळाट अलीकडे वाढला अाहे. विश्रामगृह म्हटले की मंत्री-खासदारांसह बड्या अधिकाऱ्यांची वर्दळ ठरलेलीच. दोन दिवसांपूर्वी अर्ध्याहून अधिक मंत्रिमंडळाचे विश्रामगृहात वास्तव्य होते. मंत्र्यांना व्हीआयपी ट्रिटमेंट पुरवण्यात मश्गूल झालेल्या अधिकाऱ्यांच्या लक्षात या कुत्र्यांचा उपद्रव अाला. मंत्रिमहाेदयांची खप्पामर्जी हाेऊ नये म्हणून कुत्र्यांच्या बंदाेबस्ताची कल्पना पुढे अाली. पण, हा बंदाेबस्त इतर प्रकारच्या 'बंदाेबस्ता'इतका साेपा नसल्याचे लक्षात अाल्याने अधिकारी मंडळी हैराण झाली. त्यातच पाठाेपाठ बुधवारी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा असल्याने अधिकाऱ्यांची जास्तच तारांबळ उडाली. शासकीय विश्रामगृह अखत्यारीत असलेल्या मंत्र्यांना तरी विश्रामगृहाच्या अवस्थेचे दर्शन घडू नये म्हणून अखेर सकाळपासूनच विश्रामगृह परिसरात 'मिशन श्वान' जाेरात सुरू झाले. 


... तेव्हाच समजले स्थितीचे गांभीर्य 
स्मार्ट सिटीमध्ये समावेश झालेल्या शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर हाेत चालला आहे. काही दिवसांपूर्वी एका मोकाट कुत्र्याने दीड वर्षाच्या मुलाचा थेट बळीच घेतल्याने नागरिक भयभीत झालेले असून, दहशतीखाली अाहेत. मात्र, सरकारी यंत्रणेने म्हणाव्या तितक्या गांभीर्याने तिकडे पाहिलेले नाही. अाता या कुत्र्यांची मजल थेट मंत्रिमहाेदयांच्या मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत गेल्याने तरी स्थितीचे गांभीर्य सरकारी बाबूंच्या लक्षात अाले असावे, अशी चर्चा मग साहजिकपणेच रंगली. 


अाता सामान्यांचीही घ्या काळजी... 
विश्रामगृह परिसरातील कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याचे फर्मान सोडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंत्री-अधिकाऱ्यांंप्रमाणेच सामान्य नागरिकांच्याही सुरक्षेची अशीच काळजी यंत्रणा घेईल, असा अाशावाद हा प्रकार पाहणारे सामान्यजन व्यक्त करीत हाेते. 


निर्बीजीकरणाचा ठेका; मात्र कुत्र्यांची संख्या वाढतीच 
शहरातील वाढत्या कुत्र्यांच्या त्रासामुळे महापालिकेच्या वतीने श्वान निर्बीजीकरणाचा ठेका देण्यात आलेला आहे. मात्र, शहरात मोकाट कुत्र्यांमध्ये दिवसेंदिवस अधिकच वाढ होत आहे. परिणामी, श्वान निर्बीजीकरणावरच नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याबाबत वाढत्या तक्रारी लक्षात घेता महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीरपणे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...