आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत कृषी सहसंचालकांच्या कार्यालयासमोर बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नागपूर हिवाळी अधिवेशनात घोषणा केल्याप्रमाणे बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास रॉकेल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर पोलिस व शेतकऱ्यांत शाब्दिक चकमक व धक्काबुक्की झाली. याच गोंधळात काही शेतकऱ्यांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले. ते सहायक पोलिस आयुक्तांसह अनेकांच्या अंगावर उडाले. मात्र, चोख बंदोबस्तामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. 

 

पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. न्याय मिळत नसल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी जामीन न घेता कारागृहात जाणे पसंत केले. माजी जि.प. सदस्य संतोष जाधव यांच्या नेतृत्वात गंगापूर तालुक्यातील वजनापूर व इतर गावच्या शेतकऱ्यांनी पंधरा दिवसांपूर्वीच स्थानिक प्रशासन ते मुख्यमंत्र्यांपर्यंत आत्मदहनाचा इशारा दिला होता. बुधवारी दुपारी चाळीसपेक्षा अधिक शेतकरी गळ्यात कापसाच्या बोंडाच्या माळा घालून ‘मुद्दा कळीचा बोंडअळीचा, बीटी कंपनीला पाठीशी घालू नका,’ असे लिहिलेले फलक हातात घेऊन व घोषणा देत क्रांती चौकातील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर आले. पोलिसांनी त्यांना पोलिस व्हॅनमध्ये बसण्यास सांगितले. आमच्या मागण्या-निवेदन कृषी सहसंचालकांकडे मांडू द्यावे, चर्चा करू द्या, असे शेतकरी सांगत होते. मात्र, सहायक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर एेकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे शेतकरी-पोलिसांत शाब्दिक चकमक व धक्काबुक्कीही झाली. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी खिशात आणलेल्या रॉकेलच्या बाटल्या अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला. गदारोळानंतर पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन क्रांती चौक पोलिस ठाण्यात आणले. सकाळी ११ वाजेपासून कृषी सहसंचालकांच्या कार्यालयासमोर पोलिसांचा मोठा ताफा होता. 

 

लेखी कळवले होते 
बोंडअळीग्रस्तांना नुकसान भरपाई जाहीर झालेली आहे. पंचनामे वरिष्ठ पातळीवर पाठवले आहेत. जीएचआय प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्मदहन आंदोलनाचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी शेतकऱ्यांना लेखी कळवले होते.  
 - प्रतापसिंह कदम, कृषी सहसंचालक, औरंगाबाद विभाग.

 

नोव्हेंबरमध्येही केला होता आत्मदहनाचा प्रयत्न 
बोंडअळीग्रस्तांना नुकसान भरपाई जाहीर करावी, यासाठी गेल्या नोव्हेंबरमध्ये याच शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. हिवाळी अधिवेशनात सरकारला दखल घ्यावी लागली होती.

बातम्या आणखी आहेत...