आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- 'कौन बनेगा करोडपती'द्वारे अमिताभ बच्चन आणि मोदी सरकारने निवडक २५ मोबाइल क्रमांकांची निवड केली आहे. यात तुमच्या मोबाइल क्रमांकाचा पहिला क्रमांक असून तुम्ही २५ लाख रुपये जिंकले आहेत. ही रक्कम मिळवण्यासाठी तुम्हाला कर व जीएसटीचे पैसे भरावे लागतील, अशी थाप मारून सायबर भामट्यांनी एका परिचारिकेला ५५ हजार रुपयांना गंडवले. फसल्याचे समजल्यावर परिचारिकेने हर्सूल पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
४५ वर्षीय महिला घाटी रुग्णालयात परिचारिका असून पती शेतकरी आहे. ९ फेब्रुवारी रोजी त्यांना सकाळी साडेनऊ वाजता एका सहा आकडी क्रमांकावरून कॉल आला होता. सोनी टीव्हीवरून प्रिया मल्होत्रा बोलत असल्याचे सांगून टेलिऑपरेटर कंपनीने ५ हजार मोबाइल क्रमांक निवडले होते. यातून अमिताभ बच्चन आणि मोदी सरकारने २५ निवडक क्रमांकाची निवड करून २५ लाख रुपयांचे बक्षीस जारी केले. यासाठी तुम्हाला कंपनीचे डायरेक्टर विजयकुमार आणि एमडी विक्रमसिंग स्वत: कॉल करतील, असे सांगितले. त्यानंतर अज्ञात क्रमांकावरून कॉल केलेल्या व्यक्तीने त्यांना स्टेट बँकेचा खाते क्रमांक देत त्यावर २० हजार रुपये जमा करून व्हॉट्सअॅपवर स्लीप पाठवण्यास सांगितले. महिलेला व्हॉट्सअॅपवर छायाचित्रे, व्हिडिओ आल्याने विश्वास बसला. त्यांनी दुपारी तत्काळ चार वाजता बँकेत २० हजार रुपये भरलेे. त्यानंतर १० फेब्रुवारी रोजी पुन्हा कॉल आला. या वेळी त्यांनी जीएसटीसाठी ३५ हजार रुपये भरण्यासाठी सांगितले. महिलेने त्याने दिलेल्या अॅक्सिस बँकेच्या खात्यावर पुन्हा पैसे पाठवले. आरोपींनी पुन्हा कॉल करून ५० हजारांची मागणी केली. संशय आल्याने महिलेने १५ फेब्रुवारी रोजी हर्सूल पोलिस ठाण्यात तक्रा दिली. भामट्यांनी आता व्हॉट्सअॅपद्वारे फसवणे सुरू केले आहे. नागरिकांनी अशा अज्ञात क्रमांकावरून आलेल्या मेसेजला बळी पडू नये, असे निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी सांगितले.
परिचारिकेचा पोलिसांत जबाब: मंगळसूत्र मोडून पैसे भरले, आणखी पैसे भरण्यासाठी धमकावले
१० फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास मला परत ९२३१३७६६३९११ वरून कॉल आला. तुमचे एटीएम चेक करा व त्यामधून तीन लाख रुपये लगेच काढता येतील. मी एटीएम चेक केले असता त्यात पैसे आले नाहीत. त्यांनी परत कॉल केला आणि म्हणाले, मॅडम २५ लाखांवर जीएसटी लागत असून त्यासाठी ३५ हजार रुपये भरावे लागतील. ते परवीनसिंग यांच्या अॅक्सिस बँक खात्यावर भरा. मी १२.४५ वाजता ३५ हजार रुपये भरले आणि कॉल आलेल्या क्रमांकावर पुन्हा कॉल करून पैसे भरल्याचे सांगितले. त्यावरून त्यांनी लगेच तुमचे अॅक्सिस खाते हे आंतरराष्ट्रीय खाते झाले असून त्यासाठी ५० हजार रुपये भरावे लागतील, असे सांगितले. परंतु मी माझे मंगळसूत्र मोडून पैसे टाकले आहेत, असे सांगितल्यावर त्यांनी कुणाकडून उधार घ्या, घर गहाण ठेवा, किमती वस्तू विका; परंतु ५० हजार रुपये भरा व लगेच ३ लाख रुपये काढा, असे सांगितले. थोड्या वेळाने पुन्हा कॉल येऊन ५० ऐवजी किमान २५ हजार रुपये भरा म्हणाले. पण मी पोलिसांत तक्रार करेन, असा इशारा दिला. तेव्हा कुठेही तक्रार करा, मला काही फरक नाही पडत, असे ती व्यक्ती म्हणाली. १२ फेब्रुवारी रोजी आरोपींनी पुन्हा सहा आकडी क्रमांकावरून कॉल करून मला धमकावले.'
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.