आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअाैरंगाबाद- मराठवाड्यातील जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यातील काही तालुके आणि गावांना रविवारी अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. यात सर्वाधिक नुकसान जालना जिल्ह्यात झाले आहे. या जिल्ह्यात सकाळीच झालेल्या गारपिटीत शेतात काम करण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. जालना पाठोपाठ बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील काही गावे गारांच्या तडाख्यात सापडली. गारपिटीने रब्बी ज्वारी, हरभरा, गहू आदी रब्बी पिकांसह द्राक्ष, संत्रा आणि मोसंबीच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले.
मराठवाड्यात ८ पैकी ६ जिल्ह्यांत अवकाळी पाऊस व गारपीट झाली. सर्वाधिक तडाखा जालना जिल्ह्याला बसला. चण्याच्या आकारापासून ते मोसंबीच्या आकारापर्यंत गारा पडल्याने रब्बीतील ज्वारी, हरभरा, गहू आदी पिकांसह द्राक्ष, संत्रा आणि मोसंबीच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले. आंब्यांच्या झाडाला लगडलेला मोहाेरही गळून पडला. सकाळी शेतात कामाला गेलेल्या आसाराम गणपत जगताप (६०, निवडुंगा, ता. जाफराबाद) व नामदेव लक्ष्मण शिंदे (६५, वंजार उम्रद, ता. जालना) या शेतकऱ्यांचा गारांच्या मारात मृत्यू झाला. हिंगोलीत वीज कोसळून एक जण जखमी झाला. विदर्भातील काही भागांना गारपीट व अवकाळीने झोडपले. खान्देशातील काही भागांत पाऊस-वारा होता. दरम्यान, अद्ययावत रडार यंत्रणेद्वारे गारपिटीप्रवण क्षेत्राचा अचूक इशारा मिळाला असता तर नुकसान काहीसे कमी झाले असते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
अनेक जागी ४ इंच थर
जालना : जालना, मंठा व जाफराबाद तालुक्यांत सकाळी ७.३० पासून अर्धा तास गारपिटीने अनेक जागी ४ इंचांपर्यंत गारांचा थर साचला. परतूर,अंबडला फटका बसला. जालना तालुक्यात ६२ गावांत नुकसान झाले.
बीड : गेवराई व शिरूरसह ४ तालुक्यांत २५ हून अधिक गावांत गारपिटीसह अवकाळी पाऊस कोसळला.
हिंगाेली : इंचा गावात नागसेन हरिभाऊ तपासे (२९) हा अंगावर वीज पडून गंभीर जखमी झाला.
परभणी : जिंतूर तालुक्यात गारा पडल्या. सेलू, मानवत, पाथरी आणि सोनपेठ तालुक्यात काही ठिकाणी पाऊस झाला.
नांदेड : दिवसभर ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला.
उस्मानाबाद : तालुक्यासह उमरगा, वाशी तालुक्यात पाऊस व गारपीट झाली.
लातूर : जिल्ह्यातही ढगाळ वातावरण होते. तुरळक ठिकाणी पावसाची नाेंद झाली.
औरंगाबाद : पैठण, सिल्लोड आणि पाचोडसह काही जागी सरी कोसळल्या.
विदर्भ...
अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत पाऊस -गारपीट झाली. अमरावती जिल्ह्यात वीज पडून वृद्धाचा मृत्यू झाला. बुलडाणा जिल्ह्यात ४ शेतकरी, तर अकोला जिल्ह्यात महिला जखमी झाली.
> कृषी व महसूल विभाग अधिकाऱ्यांनी गारपीटग्रस्त शेतीचे पंचनामे तत्काळ करावेत. प्रशासनाने विमा कंपन्यांची बैठक घेऊन गावनिहाय आकडेवारी द्यावी, असे निर्देश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकरांनी दिले.
> तलाठी, ग्रामसेवक, सहायक कृषी अधिकारी यांनीही तत्काळ पंचनामे जिल्हा प्रशासनाला सादर करून मदतीबाबत प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे सादर करावा, असे आदेश फुंडकर यांनी दिले आहेत.
रडार असते तर...
हवामान खात्याने ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान विदर्भ-मराठवाड्यात गारपीट आणि पावसाची शक्यता वर्तवली होती. तज्ज्ञांनुसार, अद्ययावत रडार यंत्रणा, उपग्रहाद्वारे हवामान नोंदींचे विश्लेषण उपलब्ध झाले असते तर नुकसान टाळता अाले असते. स्थानिक पातळीवरील अंदाज व्यक्त करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळाचा अभाव हे त्यामागचे कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
१३ तारखेपर्यंत पावसाचा धोका
पुणे वेधशाळेनुसार राज्यात १२ व १३ फेब्रुवारीपर्यंत पावसाची शक्यता आहे.
१२ फेब्रुवारी : विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता
१३ फेब्रुवारी : मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी : अामदार देशमुख
मराठवाड्यात व बीड जिल्ह्यात आगामी तीन दिवसात गारपीट व पावसाची शक्यता अाहे. हवामान विभागाने येत्या दोन तीन दिवसांत मराठवाड्यात विशेष करून बीड जिल्ह्यात गारपीट व अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. सर्व शेतक ऱ्यांनी खबरदारी घ्यावी. शेतातील काही पीक काढले असल्यास ते व्यवस्थित झाकून घ्यावे, असे आवाहन आमदार आर. टी. देशमुख यांनी केले आहे.
पुढच्या स्लाइड्सवर वाचा मराठवड्यातील कोणत्या जिल्ह्यात झाले किती नुकसान... गारपिटीचे फोटो व व्हिडिओ...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.