आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाआरोग्य शिबिर: आरोग्याची काळजी घेण्यासाठी सरकार जनतेच्या पाठीशी- मुख्‍यमंत्री फडणवीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लासूर स्टेशन- गरिबांना आता आजारावर चिंता करण्याचं काम नाही. राज्य सरकार आपल्या पाठीशी असून वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यभर सुरू केलेल्या महाआरोग्य सर्वरोग निदान शिबिरात लाखो रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जनतेने आरोग्याची काळजी घ्यावी दररोज व्यायाम करावा, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभर सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिराचा कार्यक्रम शनिवारी लासूर स्टेशन येथील गीताबन मैदानावरील ५० एकरावर पार पडला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.  


व्यासपीठावर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे,आयोजक आमदार प्रशांत बंब, आमदार विनायक मेटे, आमदार अतुल सावे, आमदार संजय सिरसाठ, माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, भागवत कराड, सरला बेटचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज, समाजरत्न श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अॅड. देवयानी डोणगावकर, किशोर धनायत, माजी सभापती संतोष पाटील जाधव आदींची उपस्थिती होती. लासूर स्टेशन येथे मराठवाड्यातील सर्वांत मोठे मोफत आरोग्य शिबिर गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांच्या प्रयत्नाने व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील हे आरोग्य शिबिर अनेक रुग्णांना वरदान ठरणार आहे. कारण २० लाख रुपयांपर्यंतचे अाॅपरेशन मोफत करण्यात येणार आहे.  


या आरोग्य शिबिराला मराठवाड्यातून १ लाख रुग्णांची नोंद झालेली आहे. जागतिक व भारतातील नामवंत डॉक्टर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही राज्यात ठिकठिकाणी अशा प्रकारचे आरोग्य शिबिर राबवत आहे. 


त्यामुळे जे गरीब व गरजू रुग्ण आहे. त्यांची गंभीर आजारावर मोफत शास्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे सांगितले. या महाआरोग्य सर्वरोग निदान शिबिरात सुमारे एक लाख रुग्णांची आरोग्य तपासणी, उपचार, वेळ पडल्यास मोठ्या खर्चाच्या मोफत शस्त्रक्रियादेखील करण्यात येणार आहे. शिबिराच्या यशस्वितेसाठी १७ समित्या तयार करण्यात आल्या होत्या. त्यांच्यात समन्वय साधण्यासाठी एक समन्वय समिती होती. या प्रत्येक समितीत आवश्यकतेनुसार कार्यकर्त्यांची संख्या अाहे. प्रत्येकाचे विषय, जबाबदारी निश्चित केली होती.  

 

६ कक्ष व ९० ओपीडी  
मुख्य कार्यक्रम स्थळासह ६ प्रकारचे भव्य कक्ष उभारण्यात आले आहेत. येथे रुग्णांच्या तपासणीसाठी ९० प्रकारचे बाह्यरुग्ण कक्ष अर्थात ओपीडी तयार करण्यात आल्या होत्या. या वेळी नेत्र विभाग, दंत विभाग व कर्करोग विभाग, कक्षात सामान्य शस्त्रक्रिया विभाग, स्त्री रुग्ण विभाग, मूत्रविकार विभाग, अस्थिरुग्ण विभाग, प्लास्टिक सर्जरी, बीएमडी असे विभाग, बालरुग्ण विभाग व किडनी विभाग, हृदयरोग विभाग, हृदय शस्त्रक्रिया विभाग कक्ष तयार करण्यात आले होते.

 

नेत्रदान, अवयवदान संकल्प  

याच ठिकाणी नेत्रदान व अवयवदानाची इच्छा असणाऱ्या व्यक्तींना फॉर्म भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी होणाऱ्या शस्त्रक्रियांसाठी २ हजार रक्तदात्यांच्या रक्त संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...