आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेलचे स्टार, सुविधा दर्शनी भागात नमूद करणे बंधनकारक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- आपण बुक करत असणारे हॉटेल नेमके किती तारांकित आहे? तेथे कोण-कोणत्या सुविधा आहेत? हॉटेलच्या रूमचे दर किती आहेत? हे आता हॉटेल चालकांना गुलदस्त्यात ठेवून चालणार नाही. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने एक आदेश जारी करत देशभरातील सर्व हॉटेल्सना या बाबी ठळकपणे हॉटेलच्या रिसेप्शनवर तसेच वेबसाइटवर मांडणे बंधनकारक केले आहे. यामुळे खोटी स्टार कॅटेगरी सांगून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकार बंद होतील, असा पर्यटन खात्याला विश्वास वाटतोय. औरंगाबादेतील हॉटेल व्यावसायिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून ग्राहकांच्या शंकांचे समाधान करणे सोपे जाईल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 


केंद्रीय पर्यटन मंत्रालयाची हॉटेल अँड रेस्टॉरंट अॅप्रूव्हल अँड क्लासिफिकेशन कमिटी भारतातील हॉटेल्सना १ ते ५ स्टार असा दर्जा बहाल करते. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या हॉटेल्सना हेरिटेज ग्रँड, हेरिटेज क्लासिक आणि हेरिटेज बेसिक असा दर्जा दिला जातो. मात्र, काही हॉटेल चुकीचे स्टार सांगून ग्राहकांची फसवणूक करतात. कमी स्टार असताना मोठे स्टार सांगत अधिक पैसे उकळतात. विशेषत: विदेशी पर्यटकांची या पद्धतीने फसवणूक होते. याबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने आता हॉटेल्सना त्यांना मिळालेले स्टार, उपलब्ध सुविधा आणि दर दर्शनी भागात ठळकपणे नमूद करणे बंधनकारक केले आहे. 


फसवणूक टळेल 
पर्यटन व्यावसायिक चिन्मय जोगळेकर म्हणाले, पर्यटन स्थळांवर पर्यटकांना चुकीचे स्टार रेटिंग सांगून फसवल्याचे अनेक प्रकार घडतात. ग्राहक मोठे स्टार पाहून हॉटेलात जातो. पण तेथे सुविधा नसतात. यामुळे हॉटेल आणि ग्राहकांचे वाद होतात. तर पर्यटक शहराची चुकीची प्रतिमा घेऊन जातात. या निर्णयामुळे आता ही फसवणूक टळणार असल्याचे जोगळेकर म्हणाले. 


...तर स्टार कॅटेगरी नाही 
हॉटेलच्या इमारतीत परमिट रूमव्यतिरिक्त बिअर शॉपी, वाइन शॉपी किंवा अन्य कोणतेही मद्यविक्रीचे दुकान असल्यास त्या हॉटेलला स्टार दर्जा दिला जाणार नाही. सद्यःस्थितीत अशा स्टार हॉटेलचा दर्जाही काढून घेणार असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, हॉटेल चालकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. शहरातील एका पंचतारांकित हॉटेलचे उपमहाव्यवस्थापक म्हणाले, पंचतारांकित हॉटेल्सने ग्राहकांची फसवणूक केल्याचे प्रकार औरंगाबादेत घडत नाहीत. येथे मोजकीच हॉटेल्स तारांकित आहेत. काही ग्राहक आम्हाला आमच्या तारांकित दर्जाचे पुरावे मागतात. मात्र, आता ते ठळकपणे नमूद करणे बंधनकारक केल्याने आमचा त्रास वाचेल. 

बातम्या आणखी आहेत...