आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेती स्वतःच्या नावावर करून पतीची हत्या, पत्नीस जन्मठेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आैरंगाबाद- दोन एकर शेती स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी मध्यरात्री लोखंडी गजाने गंभीर स्वरूपाची मारहाण करून पतीचा खून करणाऱ्या आणि विजेच्या धक्क्याने पतीचा मृत्यू झाल्याचे भासवणाऱ्या तिसऱ्या पत्नीला जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांनी बुधवारी (१४ फेब्रुवारी) सुनावली. रक्तस्रावातून पतीचे निधन झाल्याचा वैद्यकीय अहवाल ग्राह्य धरून न्यायालयाने पत्नीस जन्मठेप सुनावली. 


याप्रकरणी मृत रामदास साळुबा लोखंडे (४८, रा. साखरवेल, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) यांची पहिली पत्नी लक्ष्मीबाई रामदास लोखंडे यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, मृत रामदास हे आरोपी व तिसरी पत्नी संगीताबाई (४०) हिच्यासोबत राहत होते व पतीच्या नावावर असलेली दोन एकर वडिलोपार्जित जमीन स्वतःच्या नावावर करून द्यावी, असा तगादा संगीताबाई ही रामदास यांच्यामागे लावत होती. त्यावरून दोघांमध्ये भांडणे होत होती. त्यावरूनच २१ ऑगस्ट २०१२ रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास आरोपीने रामदास यांच्या डोक्यावर, तसेच हात-पाय, ओठ, डोळे, पाठ आदी अनेक ठिकाणी लोखंडी गजाने गंभीर स्वरूपाची मारहाण करून रामदास यांचा खून केला होता. तसेच रामदास यांना विजेचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी आरोपीविरुद्ध कलम ३०२ अन्वये पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 

बातम्या आणखी आहेत...