आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबाजोगाईतील तरुणाच्या पुढाकाराने ऑस्ट्रेलियात मराठी शाळा! १८ विद्यार्थी गिरवतात धडे!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई- मराठी भाषिक - मग तो जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी त्याची नाळ माय मराठीशी  कायम जोडलेली असते. आपल्या मायबोलीचा झेंडा तो जाईल तिथे फडकावतच असतो. अंबाजोगाईचा कपिल चौसाळकर आणि त्याच्या महाराष्ट्रीयन मित्रांनी हा झेंडा आता थेट ऑस्ट्रेलियातही फडकावला आहे. ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड या सर्वात मोठ्या शहरात त्यांनी मराठी शाळा सुरू केली आहे. आठवड्यातून एकदा भरणाऱ्या या शाळेत सध्या १८ विद्यार्थी ‘गमभन’ गिरवत आहेत. 


मूळ अंबाजोगाईचे असलेेले कपिल कमलाकर चौसाळकर हे ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठात अधिष्ठाता पदावर कार्यरत आहेत. त्यांच्यासोबतच महाराष्ट्रातील मिलिंद शिंदे, डॉ. प्रीतम गानू, रेश्मा कुलकर्णी हेही कार्यरत आहेत. ऑस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणावर मराठी लोक नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झाले असून संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांना ऑस्ट्रेलियात गेल्यानंतर अपत्यप्राप्ती झाली आहे. त्या मुलांचा तसा मराठी आणि महाराष्ट्राशी संबंधही नाही. त्यामुळेच  आपल्या मातृभाषेची ओळख, सण, उत्सव, परंपरा,  मराठी इतिहास हे सर्व आॅस्ट्रेलियात जन्मलेल्या या नव्या पिढीला व्हावी यासाठी महाराष्ट्रीयन लोकांनी एकत्र येऊन तेथे  मराठी शाळा सुरू केली आहे. प्रत्येक रविवारी ३ ते ५ या वेळेत भरणाऱ्या या शाळेत मराठीसह संस्कृतचेही शिक्षण देण्यात येत आहे. सध्या १८ मुले मराठीचे धडे गिरवत आहेत. गतवर्षी २० ऑगस्टला सुरू झालेल्या या शाळेमुळे विद्यार्थ्यांना आता चांगले मराठी लिहिता वाचता येऊ लागले आहे. यासाठी सर्व जण मिळून साखळी पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करत आहेत. 


कपिल चौसाळकर म्हणतात, मुलांना मराठीचा इतिहास माहिती व्हावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते  महाराष्ट्रीयन गणेशोत्सव, दिवाळी व  डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी या सर्व महात्म्यांची ओळख मराठी भाषेतून मुला-मुलींना करून देत आहोत. “अॅडलेड मराठी विद्यालयाची’ मराठी मंडळ वेबसाइटही सुरू करण्यात आली  आहे. 


महाराष्ट्रीय खेळांची माहिती 
महाराष्ट्रीयन खेळ मुलांंना कळावेत याचाही प्रयत्न केला जात आहे. मुलांना कबड्डी, कुस्ती, मल्लखांब आदी खेळांची माहिती दिली जात आहे. ही शाळा पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियन नागरिकही तेथे भेट देतात. महाराष्ट्रात मराठी भाषा हा आमचा स्वाभिमान आहे. आपल्याकडची माणसं जेव्हा तिथेच स्थायिक होतात आणि नागरिकत्व बाहेरच्या देशाचं घेतात तेव्हा त्यांच्या पुढच्या पिढीसाठी मराठीची ओळख महत्वाची असते. ती या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करत असल्याचे कपिल चौसाळकर यांनी सांगितले

बातम्या आणखी आहेत...