आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तळकोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात मान्सून दाखल ; जोरदार पावसाचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद -  नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून  शुक्रवारी तळकोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात दाखल झाला. भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार (अायएमडी) शनिवारी मान्सून मुंबईत दाखल होण्यास अनुकूल स्थिती आहे. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार रविवारपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.    


अतिवृष्टी, जोरदार पावसाचा इशारा

पुणे वेधशाळेनुसार, राज्यात ९ ते १२ जून या काळात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, काही ठिकाणी जोरदार, तर बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होईल. 

  
९ व १० जून 

कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार, तुरळक ठिकाणी अतिवृष्टी. विदर्भ, मराठवाड्यात  बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.    

११ व १२ जून

 कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस.

    
महाराष्ट्रात सध्या कोठे आहे मान्सून 

शुक्रवारी मान्सूनने आगेकूच करत तळकोकणात प्रवेश केला. अरबी समुद्रातील या मान्सून शाखेने दक्षिण.कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा ओलांडत रत्नागिरीपर्यंत मुसंडी मारली आहे. तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांसह दक्षिण सोलापूर जिल्हा, मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर जिल्ह्याचा कर्नाटक सीमेलगतचा भाग, विदर्भ व नांदेड जिल्ह्याचा तेलंगणा सीमेलगतच्या भागापर्यंत शनिवारी मान्सून पोहोचला आहे.

 

आयएमडीनुसार, शुक्रवारी मान्सूनने आगेकूच करत मध्य अरबी समुद्राचा काही भाग, गोवा, दक्षिण कोकणाचा काही भाग, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाचा काही भाग, दक्षिण छत्तीसगड, दक्षिण ओडिशा, संपूर्ण तेलंगणा आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीचा बहुतांश भाग व्यापला आहे. मंुबईसह संपूर्ण महाराष्ट्र मान्सून दाखल होण्यास अनुकूल स्थिती असून रविवारपर्यंत मान्सून महाराष्ट्र ओलांडून दक्षिण गुजरातेत दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या मान्सूनच्या अरबी समुद्रातील शाखेची उत्तर सीमा रत्नागिरी, सोलापूर, नांदेड, अदिलाबाद, बैलादिया, मलकानगिरी आणि कलिंगपट्टणम अशी आहे.    

 

 

बातम्या आणखी आहेत...