आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदयी नाथांचा जिव्हाळा, आलो तुझ्या नगरी नाथा....; आजपासून नाथषष्ठीला प्रारंभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण-  मुखी तुझे नाव एकनाथ,ओढ तुझी लागे जिवा, सदा सुखी ठेव माझं, आस तुझी जिवा हृदयी नाथांचा जिव्हाळा, भक्तीचा मेळावा, म्हणत आज पैठणनगरीत हजारो भाविक वारकरी दाखल झाले. दोन दिवसांपासून वारकरी पैठणलगत आपल्या पालखी दिंड्यांतून नाथनगरीलगत दाखल होत आहे. वाळवंटात आपले पाल टाकण्यास वारकऱ्यांनी सुुरुवात केली आहे. बुधवारपासून तीनदिवसीय नाथषष्ठी सोहळ्यास प्रारंभ होत आहे. मंगळवारी सायंकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी एक किमी रांगा लागल्या होत्या. 


या सोहळ्यासाठी नाथ संस्थान व नगर परिषदेच्या सुमारे ७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी  तयारी केली. यात्रेसाठी उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल राठोड, पोलिस निरीक्षक चंदन इमले यांच्या मार्गदर्शनाखाली २१२ पोलिस कर्मचारी, ४३ महिला पोलिस कर्मचारी, १९ पोलिस अधिकारी, होमगार्ड आदींसह आपत्ती निवारणासाठी विशेष पथक तयार केले असल्याचे तहसीलदार महेश सावंत यांनी सांगितले.   


पाचशे दिंड्या येणार

मंगळवारी सायंकाळपर्यंत नाथनगरीत चारशेच्या जवळपास दिंड्या दाखल झाल्या होत्या.  रात्रभरात पाचशेच्या जवळपास दिंड्या दाखल होतील. या दंग्यांसाठी फडातच पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  


नगराध्यक्ष तळ ठोकून

यात्रेमध्ये एकाही वारकरी, भाविक यांची गैरसोय होणार नाही यासाठी नाथ संस्थानमध्ये आमदारासह नगराध्यक्ष सूरज लोळगे, माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, नगरसेवक आबा बरकसे, महेश जोशी आदींसह डॉ.विष्णू बाबर, प्रकाश वानोळे आदी यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांच्या सुविधांकडे लक्ष देत आहेत.

 

असा  असेल तीनदिवसीय सोहळा 

बुधवार, ७ मार्च
सकाळी ७ वा वारकरी पूजन, दु. १२:३० वा नाथवंशजांच्या निर्याण दिंडी, मानाच्या दिंड्यांसह पहिल्या दिंडीचे नाथ समाधी मंदिराकडे प्रस्थान, दुपारी २.३० वा हरिदासी व वारकरी कीर्तन, रात्री ७ वा हरिपाठ .  

 

गुरुवार, ८ मार्च : सप्तमी छबिना 
स. ११ वा. श्री एकनाथ महाराज पादुका पूजन, दु. १२ वा उपदेश / अनुग्रह प्रदान सोहळा, दु. १ नंतर महाप्रसाद, सायंकाळी ६ वा. हरिपाठ, रात्री १ वाजता श्री भय्यासाहेब महाराज पैठणकर यांच्या वाड्यातील नाथपादुकांचा पारंपरिक मार्गे छबिना- श्री संत एकनाथ महाराजांच्या दोन पादुका अस्तित्वात असून, एक जोड हा गावातील नाथ मंदिरात असून तो केवळ पंढरपूरच्या वारीच्या वेळीच लोकदर्शनार्थ सव्वा महिना प्रवासात असतो. दुसरा जोड हा नाथवंशज वै. भय्यासाहेब महाराज पैठणकर यांच्या चारही मुलांकडे वाड्यात असून पादुकांचा हा जोड वर्षातून केवळ एकदाच फाल्गुन वद्य सप्तमीला पैठणमध्ये दर्शनार्थ मिरवला जातो.

 

शुक्रवार, ९  मार्च 

अष्टमी काला - सकाळी ६ वाजता वाळवंटामार्गे नाथपादुकांचे गावातील नाथमंदिरात आगमन, दु. १२ वा महाप्रसाद , सायंकाळी ४:३० वा नाथवंशजांच्या काला दिंडीचे समाधी मंदिराकडे प्रस्थान, सूर्यास्तासमयी दहीहंडी नाथ वंशज यांच्या हस्ते फोडली जाणार आहे.    

 

पवित्र रांजण भरला 
आज मंगळवारी माजलगाव येथील शीलाबाई मुरलीधर भानप यांच्या घागरीच्या पाण्याने नाथवाड्यातील श्रीखंड्या रांजण भरला. या महिलेचा नाथवंशज रघुनाथबुवा पांडव, रेखाताई कुलकर्णी आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  

 

बातम्या आणखी आहेत...