आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजेट १८६४ कोटींचे; मात्र ७५० कोटींची देणी द्यायचे नियोजन नाही; शहरातील विकास कामांचा खोळंबा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- महापौर नंदकुमार घोडेले यांनी महापालिकेच्या अंदाजपत्रकाचा आकडा थेट १८०० कोटींच्या पुढे नेऊन ठेवला. त्यातील कामे लवकर सुरू व्हावीत, अशी नगरसेवकांची इच्छा आहे. प्रत्यक्षात मनपा आज घडीला ठेकेदारांचे ७५० कोटींचे देणे लागते. परंतु ही रक्कम त्यांच्याकडे नाही. जर जुनी देणी दिली गेली नाही तर ठेकेदार काम करणार नाहीत. त्यामुळे नवीन कामे सुरू होतीलच कशी, असा प्रश्न आहे. सध्या ठेकेदारांना महिन्याला सरासरी पाच कोटी दिले जातात. ही गती लक्षात घेता सर्व देणी देण्यासाठी किमान १२ वर्षे लागतील. तेव्हा १८६४ कोटींची कामे होतील कधी याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही. अगदी हे अंदाजपत्रक अंतिम करणारे महापौर घोडेलेही नाही. 


१०० कोटींची बिले तयार
ठेकेदारांनी काम पूर्ण केल्यानंतर अधिकाऱ्यांकडून तपासणी होऊन त्या कामाची बिले तयार केली जातात. अशी १०० कोटींची बिले लेखा विभागाकडे तयार आहेत. म्हणजे आता त्यांचे फक्त धनादेश तयार करायचे आहे. त्यावर सही झाली की ही रक्कम ठेकेदाराच्या खात्यावर जमा होईल. त्यानंतर ६५० कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. त्यांची बिलेही लवकरच तयार होतील. म्हणजेच एकूण ७५० कोटी रुपये आजघडीला महापालिकेला द्यायचे आहेत. 


काय म्हणतात महापौर नंदकुमार घोडेले... 
प्रश्न : आधीच ७५० कोटींची देणी असताना आपण बजेटचा आकडा का फुगवला? 
उत्तर :
आकडा फुगवलेला नाही. शहराची गरज, मनपाचे उत्पन्न व शासनाकडून येणारा निधी गृहीत धरून अंदाजपत्रक तयार केले. 


प्रश्न : १८६४ कोटी येतील कोठून? 
उत्तर :
नक्कीच येतील. मालमत्ता करातूनच आपण ४०० कोटींचा पल्ला गाठू शकतो. मालमत्ता सर्वेक्षण सुरू झाले आहे. काही महिन्यांत तुम्हाला याचे परिणाम दिसतील. 
 

प्रश्न : मालमत्ता करातून गतवर्षी फक्त ८० कोटी आले होते. एकाच वर्षात पाचपट वाढ कशी होईल? 
उत्तर :
सर्वेक्षण झाल्यानंतर मालमत्तांची संख्या वाढेल आणि महसुलात वाढ होईल. 


 प्रश्न : ठेकेदारांची बिले गेल्या ३ वर्षांपासून थकली आहेत. त्यांना देण्यासाठी पैसे नाहीत तरीही १८६४ कोटींचे बजेट 
उत्तर :
ठेकेदारांची देणी देणे सुरू आहे. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. विलंब होतोय हे खरे आहे. परंतु सर्व ठेकेदारांना पैसे मिळतील आणि हे ठेकेदार नवीन कामेही करतील. तुम्ही उगाच १२ वर्षे लागतील म्हणताय. वर्षभरात सर्वांची देणी दिली जातील. 

 

 प्रश्न : आज मनपाच्या खात्यावर तर फक्त सव्वा कोटी रुपये आहेत. 
 उत्तर :
हो, दररोज पैसे येत असतात अन् जात असतात. येत्या काळात पैसे येण्याचे प्रमाण वाढेल. आम्ही लवकरच कर अदालत व जल अदालत आयोजित करतोय. वादग्रस्त मालमत्तांचे पैसे त्यातून मिळतील. यासाठी मी स्वत: प्रयत्न करणार आहे. 


 प्रश्न : आयुक्तांनी आकडा फुगवला, त्याचे काय? 
 उत्तर :
त्याला आकडा फुगवणे कसे म्हणता येईल. बजेट तयार करताना ते नव्हते. ते नंतर आले. त्यांना ज्या कामांचे प्राधान्य वाटले ते त्यांनी दिले. त्यांनी सुचवलेली कामेही महत्त्वाची नि शहराचा चेहरा बदलणारी आहे. त्यामुळे मी त्यांनी सुचवलेल्या कामांचा समावेश बजेटमध्ये केला. 


महिन्याला निघतात ४ कोटींची बिले 
७५० कोटींची देणी असताना ठेकेदारांना महिन्याकाठी फक्त ४ कोटी रुपये दिले जातात. कधी जास्तीचे पैसे आले तर ही रक्कम पाच कोटींपर्यंत जाते. ५ कोटी गृहीत धरले तर वर्षाला ६० कोटी ठेकेदारांना मिळतात. ही गती लक्षात घेतली तर ७५० कोटी रुपये देण्यासाठी किमान १२ वर्षे लागतील असे चित्र आहे. म्हणजे मागील देणी देण्यासाठी जर इतकी वर्षे लागणार असतील तर पुढील कामांचे काय, याचे उत्तर अजून सापडायचे आहे. 


... तर ठेकेदार आत्महत्या करतील 
अनेक ठेकेदारांची गेल्या तीन वर्षांपासूनची देणी थांबली आहे. काहीही करा पण एका कामाचा तरी धनादेश काढून द्या, असे आर्जव ही मंडळी नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांकडे करताना दिसतात. ठेकेदारांनी त्यांची सर्व पुंजी गुंतवून महापालिकेची कामे केली आहेत. आता त्यांना पैसे मिळाले नाही तर आत्महत्या करावी लागेल, अशा प्रतिक्रिया खासगीत बोलताना ठेकेदारांनी व्यक्त केल्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...