आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरमहा एक कोटी जास्तीचे खर्चून कचरा नारेगावऐवजी बाभूळगावला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- १९९७ मध्ये महापालिकेने नारेगाव येथे कचरा टाकणे बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याची तब्बल २१ वर्षांनंतर अंमलबजावणी झाली. १६ फेब्रुवारीपासून शहरातील कचरा पुढील किमान तीन महिने पैठण रोडवरील बाभूळगाव (गट क्रमांक ३७) येथे ग्रीन इंडिया कंपनीच्या २५ एकर जागेवर टाकला जाणार आहे. त्यासाठी महापालिका कंपनीला दररोज प्रतिटन ७५० रुपये दराने ४०० टनांसाठी तीन लाख म्हणजे दरमहा ९० लाख रुपये देणार आहे. याशिवाय १० लाख रुपये कचरा वाहतुकीवर खर्च वाढेल. त्यामुळे दरमहा सुमारे एक कोटी खर्चून बाभूळगावला पोहोचणार आहे. तेथे कंपनी कचऱ्यापासून खत तयार करून विकेल. ती रक्कम कंपनीलाच मिळणार आहे. आतापर्यंत नारेगावात कचरा टाकण्यासाठी मनपा दरमहा एक कोटी १२ लाख रुपये खर्च करत होती. त्यात कंपनीचे ९० लाख आणि वाहतुकीचे १० दहा लाख असा एक कोटींचा बोजा पडेल. मनपा फंडातून हा वाढीव खर्च भागवला जाईल, असा दावा मनपा आयुक्त दीपक मुगळीकर यांनी केला. 


नारेगावातील डेपोत १९८० पासून कचरा टाकला जात असल्याने तेथे भयंकर प्रदूषण वाढले होते. मनपाने १९९७ पासून आश्वासने देऊन कार्यवाहीस टाळाटाळ केली. म्हणून तीन महिन्यांपूर्वी नारेगाव परिसरातील ग्रामस्थांनी जोरदार आंदोलन केले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर १६ फेब्रुवारीपर्यंत मुदत देऊन माघार घेतली होती. 


खर्च होणारच होता 
प्र. : एवढा वाढीव खर्च मनपा कसा करणार? 
उ. : काहीही केले तरी जास्तीचा खर्च लागणारच होता. हे काम प्राधान्याचे असल्याने खर्च करणे आवश्यक होते. 
प्र. : आपण जागेची पाहणी केली का ? 
उ. होय, जागेची पाहणी करूनच कंपनीची निवड केली. 
प्र. : ना हरकत प्रमाणपत्रांचे काय? 
उ. : गावकरी आणि संबंधित विभागांची ना हरकत प्रमाणपत्रे मिळवण्याची जबाबदारी कंपनीची आहे. ती त्यांनी दाखवल्यावरच काम दिले आहे. 
- श्रीकृष्ण भालसिंग, अतिरिक्त आयुक्त, मनपा 


... तरीही नारेगावात एक प्रयत्न 
१६ फेब्रुवारीपासून नारेगावात कचऱ्याचा एक ट्रकही येऊ देणार नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले असले तरी शुक्रवारी काही गाड्या पाठवण्याचा प्रयत्न होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 
कचरा वाहतुकीच्या खर्चाचे दर महिन्याचे गणित असे 
कचऱ्याचे एक वाहन शहरात फिरून नारेगावसाठी १८ किलोमीटर ये-जा करते. एका वाहनाला एका फेरीसाठी १२६ रुपये डिझेल खर्च येतो. दरमहा दुरुस्ती, चालकांचे वेतन व इंधनापोटी ७४ लाख ४२ हजार लागतात. भाड्याचे २२ ट्रॅक्टर व २२ रिक्षांवर दरमहा ३७ लाख ५८ हजार वेगळा खर्च होतात. म्हणजे किमान एक कोटी १२ लाख वाहतूक खर्च. बाभूळगाव २२ किलोमीटरवर असल्याने १५० ट्रक, टेेम्पोचे ६०० किलोमीटर वाढतील. त्यावर डिझेलसाठी किमान १० लाख रुपये खर्च वाढेल. 


कचरा प्रक्रिया यंत्रांसाठी ८ दिवसांत निविदा
वॉर्डातील कचऱ्याचा वॉर्डातच निपटारा करण्यासाठी आठ दिवसांत निविदा जारी होतील. वरिष्ठ स्तरावरील मोर्चेबांधणीनुसार इंदूरच्या इको प्लोमन कंपनीची ही यंत्रे लवकरच शहरात येतील. 


१९९७ मध्ये नारेगावात कचरा बंदीचा झाला होता निर्णय 
- १९९७ मध्ये नारेगावात कचरा टाकणे बंद करण्याचा घेतला होता निर्णय, तब्बल २१वर्षांनंतर अंमलबजावणी 
- बाभूळगावातील खासगी २५ एकर जागेवर पोहोचणाऱ्या कचऱ्यापासून ग्रीन इंडिया संस्था खत तयार करणार 
- ग्रीन इंडियाला प्रति टन ७५० रुपये देऊन कचरा बाभूळगावला टाकणार 
- मनपाने गायरानांचा शोध घेतला मात्र प्रत्येक ठिकाणी ग्रामस्थांनी केला विरोध 


अखेर खासगीकरण
त्यामुळे मनपाने खासगीकरणाचा पर्याय शोधत निविदा मागवल्या व ग्रीन इंडिया कंपनीला तात्पुरत्या स्वरूपात हे काम देण्याच्या ऐनवेळच्या प्रस्तावास गुरुवारी (१५ फेब्रुवारी) सभेत मंजुरी देण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...