आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी शेतकऱ्यांना विष द्या अन् खुशाल मनपाचा कचरा डेपो वाळूजला आणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर त्याचबरोबर परिसरातील शेती कचरा डेपोमुळे प्रदूषित होणार आहे. त्यामुळे आम्हाला कुढत मरण येण्यापेक्षा प्रशासनाने अगाेदर मुलाबाळांसह आम्हाला विषारी आैषध द्यावे आणि त्यानंतर मनपाचा कचरा डेपो वाळूज शिवारात आणावा,अशी संतप्त भावना महानगरपालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांना घेराव घालून शेकडो शेतकऱ्यांनी बुधवारी बोलून दाखवली. गंगापूरचे तहसीलदार चंद्रकांत शेळके, सहायक पोलिस आयुक्त ज्ञानोबा मुंडे यांच्यासह अधिकारी व पोलिस ताफा या वेळी उपस्थित होता. 


शहरातील कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मनपाच्या कचरा डेपोची कोंडी फुटण्याचे नाव घेईना. या पार्श्वभूमीवर अग्रवाल टस्टीच्या वतीने मनपाशी भाडेपट्ट्यावर करार करून त्यांची वाळूज शिवारातील गट क्र. ५१ ही शेती कचरा डेपो प्रक्रिया प्रकल्पासाठी देऊ केली आहे. त्यासाठी या शेतीत बुधवारी पोकलेन यंत्राच्या साहाय्याने २५ फूट खोलीचा खड्डा खोदण्यात आला. या खड्ड्यात भल्या पहाटे डंपरमधून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीयुक्त कचरा आणून टाकला गेला. सकाळी वाळूज गावामधून कापडाने झाकलेल्या स्थितीत डंपरची धावपळ सुरू असल्याने ग्रामस्थांना शंका आली तेव्हा वाळूज, परदेसवाडी, पैठणखेडा, नायगव्हाण-खंडेवाडी, हनुमंतगाव, नायगाव भागातील तरुणांनी सुरू असलेल्या डंपरचा पाठलाग केला. तेव्हा त्यांच्या लक्षात ही बाब आली. 


शेकडो शेतकऱ्यांनी घेतली धाव 
मनपाचा कचरा डेपो वाळूज शिवारात व अगदी नायगव्हाण-खंडेवाडी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीलगत होत असल्याची माहिती ग्रामस्थांना कळाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या परिसरातील पाणीसाठे दूषित होऊन शेती नापिकी होणार आहेत. धोका ग्रामस्थांनी व्यक्त केला. 


मनपा आयुक्त, तहसीलदारांना घातला घेराव
परिसरातील शेतकऱ्यांनी कचरा डेपोला विरोध केल्याची माहिती मनपा आयुक्त डी.एम.मुंगळीकर यांना देण्यात आली. ही माहिती मिळाल्यानंतर मंुगळीकर, गंगापूरचे तहसीलदार चंद्रकांत शेळके, सहायक पोलिस आयुक्त ज्ञानोबा मुंडे, पोलिस निरीक्षक सतीशकुमार टाक हा अधिकारी वर्ग दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घटनास्थळी पोहोचला. घटनास्थळाला भेट दिल्यानंतर त्यांनी लगत थांबलेल्या शेतकरी व ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. किमान सुरुवातीचे चार दिवस तरी कचरा टाकू द्यावा, अशी मागणी मनपा आयुक्त मंुगळीकर व तहसीलदार शेळके यांनी केली. मात्र शेतकरी व ग्रामस्थांचा विरोध कमी होऊ शकला नाही. या अधिकारी वर्गाला घेराव घालून त्यांनी प्रथम आम्हाला विष द्या, नंतरच कचरा डेपो करा, अशी मागणी केली. तेव्हा अधिकारी वर्गाचा नाइलाज झाला. त्यामुळे अर्ध्या तासाच्या चर्चेनंतर तोडगा निघत नसल्याचे लक्षात आल्याने त्यांनी काढता पाय घेतला. नायगव्हाण-खंडेवाडी-पैठणखेड ग्रामपंचायतीच्या वतीने मनपा आयुक्त मंुगळीकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक गजानन सोनटक्के, अमित बागूल, उपसरपंच ज्ञानेश्वर राघुडे, माजी सरपंच भानुदास गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य पपीन माने, तलाठी दीपक पाटील कऱ्हाळे, काकासाहेब पाटील चापे, शिवप्रसाद अग्रवाल, दयानंद माने, दीपक अग्रवाल यांच्यासह १२५ शेतकरी उपस्थित होते. 

 

आरोग्याचा प्रश्न उभा राहणार 
कचरा डेपो केल्यास शेतकरी उद््ध्वस्त होतील. प्रशासनाने कचरा डेपोसंदर्भातला विचार सोडून द्यावा. आमच्यावर उपासमारीची वेळ येईल. आरोग्याचा प्रश्न उभा राहिल. 
- नारायण राघुडे, शेतकरी, नायगव्हाण-खंडेवाडी. 


परिसराला इजा पोहोचणार नाही 
हा कचरा प्रक्रिया प्रकल्प आहे. तेथे अत्याधुनिक यंत्रणा बसवली जाणार आहे. त्याठिकाणी नेलेला कचरा हा प्लास्टिक वेगळे करून व आेला-सुका कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया करणार आहोत. त्यातून सेंद्रिय खतनिर्मिती होणार आहे. 
- डी.एम.मुगळीकर आयुक्त,महानगरपालिका,आैरंगाबाद. 


शासनाला विकास हवा आहे का? 
या नियोजित कचरा प्रक्रिया प्रकल्पालगत गावाची पाणीपुरवठा विहीर आहे. या प्रकल्पामुळे विहिरीचे पाणी खराब होऊन ते पिता येणार नाही. शासनाला असा विकास हवा आहे का? 
- उत्तम गायकवाड, शेतकरी खंडेवाडी. 


असा विकास नको आहे 
शहरातील दुर्गंधीयुक्त कचरा चांगल्या व सुपीक जमिनीत आणून टाकायचा. येथील चांगली जमीन खराब करायची व त्याला म्हणायचे विकास. शहर स्वच्छ करून गावे खराब करायची. असा विकास अाम्हाला नको आहे. त्याला आमचा प्रखर विरोध आहे.

- अनिल धनगर, शेतकरी, नायगव्हाण-खंडेवाडी. 


मनपाला कुणी थारा देईना म्हणून त्यांनी हा कचरा वाळूज पर्यायाने नायगव्हाण-खंडेवाडीलगत आणून टाकण्याचा घाट घातला आहे. मात्र, प्रशासनाला आमचे सांगणे आहे. तसा प्रयत्न करू नका. तसे करायचेच तर आम्हाला मुलाबाळांसह विषारी आैषध आणून द्या. आम्ही सहकुटुंब घेतो. 
- भगवान सत्तावन्न, ग्रामस्थ, नायगव्हाण-खंडेवाडी. 

बातम्या आणखी आहेत...