आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मा पाटलांच्या शेताचे दोन वेगवेगळे पंचनामे; खरा पंचनामा कोणता? सरकार संभ्रमात, चौकशी सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मंत्रालयात विष घेऊन आत्महत्या करणारे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांच्या शेताचे दोन वेगवेगळे पंचनामे असून त्यात शेतातील झाडांची संख्याही विभिन्न आहे. त्यामुळे खरा पंचनामा कोणता, असा प्रश्न सरकारला पडला असून याप्रकरणी एक महिन्यात चौकशी करण्याचे आदेश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. 


२२ जानेवारी रोजी धर्मा पाटील यांनी त्यांच्या अधिग्रहित शेताचा योग्य मोबदला मिळावा अशी मागणी करीत मंत्रालयात विष घेतले होते. रविवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मोबदल्याचे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांच्या मुलाने घेतली होती. त्यांच्या शेताचे फेरमूल्यांकन ३० दिवसांत करण्याचे लेखी आश्वासन बावनकुळे यांच्याकडून आज मिळाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. 


इशारा दिला होता
धर्मा पाटील यांनी दोन डिसेंबर रोजी दिलेल्या निवेदनात महिनाभरात योग्य मोबदला मिळाला नाही तर आपण आत्महत्या करू असा इशारा दिला होता. २२ जानेवारी रोजी ऊर्जामंत्र्यांच्या दालनासमोर त्यांनी विष प्राशन केले होते.


मुद्दा मिळताच विरोधक झाले आक्रमक  
धर्मा पाटील यांचा रविवारी रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षांचे नेते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्री जयकुमार रावळ यांच्यावर शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसने याप्रकरणी सरकार दोषी असल्याचे म्हटले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेनेनेदेखील सरकारवर टीका केली आहे.


धनंजय मुंडे म्हणाले, सरकारवर गुन्हा नोंदवा
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे औरंगाबादमध्ये म्हणाले की, धर्मा पाटील यांची सरकारनेच हत्या केली आहे. त्यामुळे याप्रकरणी सरकारच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला पाहिजे. अन्य एका शेतकऱ्याला अनेक पट जास्त मोबदला दिल्याचे बिंग फुटू नये म्हणून सरकार मुद्दाम दुर्लक्ष करीत होते. आधीच पुनर्मूल्यांकन मान्य केले असते तर ते हे घडले नसते.


बावनकुळे म्हणाले, दोषींवर कारवाई करू
राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, वेगवेगळे दोन पंचनामे कसे केले गेले, त्यासाठी कोण दोषी आहे, याची चौकशी ३० दिवसांत करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल. अन्य शेतकऱ्यांच्या जमिनीलाही सारखाच भाव दिला आहे. अन्य रक्कम झाडे आणि इतर मालमत्ता यांची मिळाली आहे.


आघाडी सरकारने सक्ती केली
आघाडी सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय करीत सक्तीने अंतिम निवाड्याची नोटीस काढली. त्यामुळे धर्मा पाटलांवर ही वेळ आली आहे. 
- जयकुमार रावळ, पालकमंत्री तथा आमदार, शिंदखेडा 


पंचनामे घरी बसून केले गेले
धर्मा पाटील आणि अन्य शेतकऱ्यांच्या जमिनीचे पंचनामे अधिकाऱ्यांनी घरी बसून केले आहेत. यामागे भूमाफिया व दलाल आहेत.
- अनिल गोटे, भाजप आमदार, धुळे


‘दिव्य मराठी’ चे पाच प्रश्न
१. धर्मा पाटलांच्या शेताच्या दोन पंचनाम्यांपैकी खरा पंचनामा कोणता हे सरकार आता कसे ठरवणार?
२. नव्याने पंचनामा झाला तर धर्मा पाटील यांच्या शेतात आज एकही झाड नाही. त्याची नोंद कशी घेतली जाईल?
३. एजंट जयदेव देसलेने कोट्यवधी रुपये मिळवल्याचा आरोप होता. कोण आहे हा देसले एजंट?
४. विषाची बाटली घेऊन मंत्रालयात येणाऱ्या धर्मा पाटील यांची आवश्यक ती तपासणी झाली नव्हती का?
५. धर्मा पाटलांच्या वारसांना नव्याने मोबदला मिळाला तर अशा अन्य सहा शेतकऱ्यांनाही तो मिळेल का?

बातम्या आणखी आहेत...