आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोलवाडी, कांचनवाडीत कचरा टाकण्याचा प्रयत्न हाणून पाडला, शहरात कचराकोंडी कायम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नारेगावातील आंदोलनामुळे निर्माण झालेली कचरा कोंडी १६ व्या दिवशीही कायम राहिली. गोलवाडी, कांचनवाडी येथे कचरा टाकण्याचा मनपाचा प्रयत्न ग्रामस्थ, नागरिकांनी दगडफेक करत हाणून पाडला. दुसरीकडे नारेगाववासीयांचे मन वळवण्याचे प्रयत्न सलग तिसऱ्या दिवशीही अयशस्वी झाले. १०० दिवसांचा अवधी दिला तर निधी देऊ, असा विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिलेला प्रस्ताव आंदोलकांनी फेटाळला.


शनिवारी सकाळी महापालिकेने व्यूहरचना करत गोलवाडी आणि कांचनवाडी येथे कचऱ्याचे ट्रक पाठवले. त्याची माहिती मिळताच लोक जमा झाले. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत येथे कचरा टाकू देणार नाही, असे ठणकावले. त्यांचा विरोध पोलिसांच्या मदतीने हाणून पाडत काही ट्रक कचरा टाकलाही गेला. तेव्हा लोक आक्रमक झाले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दगडफेकही केली. त्यांचा पवित्रा पाहून ट्रक माघारी फिरले. गोलवाडीच्या माजी सरपंच शांताबाई कीर्तिशाही यांनी कचरा लोकप्रतिनिधींच्या घरासमोर नेऊन टाकू, असा इशाराही दिला.


परिस्थिती आवाक्याबाहेर जाऊ शकते, असे लक्षात आल्यावर घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डी. पी. कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी तेथून निघून गेले. दरम्यान, कचरा टाकण्यासाठी विरोध करणाऱ्यांमध्ये नगरसेवकांचे नातेवाईक असल्याचे निदर्शनास आल्यास नगरसेवकाचे पद रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाईल, असा इशारा मनपा आयुक्त दीपक मुगळीकर यांनी शनिवारी सायंकाळी दिला. गेल्या तीन-चार दिवसांत ठिकठिकाणी कचरा टाकण्याचा प्रयत्न मनपातर्फे झाला. तेथे आंदोलन करणाऱ्या ७५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

 

सुनावणीकडे लागले लक्ष
कचराकोंडी प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. मनपाच्या कारभारावर विश्वास नसल्याचे मत व्यक्त करत न्यायालयाने मुख्य सचिवांनीच शपथपत्र दाखल करावे, असे म्हटले होते. त्यानुसार विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी मुख्य सचिवांशी दोन टप्प्यांत चर्चा केली. सोमवारी शपथपत्र दाखल होऊ शकते. त्यावर काय आदेश मिळतात, याकडे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...